रानभाजी महोत्सवास भुसावळकरांचा उदंड प्रतिसाद : अवघ्या अडीच तासात सर्व रानभाज्यांची विक्री

भुसावळ, : येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र कृषी विभाग, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ, रेलसीटी व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या तर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्याला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या खरेदीचा ग्राहकांनी आनंद लुटला. अशा प्रकारचे महोत्सवाचे महिन्यात एकदा आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा ग्राहक आयोजकांकडे व्यक्त करीत होते.
या आगळावेगळा रानभाज्या महोत्सवचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, सरकारी वकील अॅड नितिन खरे, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विक्रीसाठी प्रांगणात व रानभाज्यांच्या माहितीसाठी हा महोत्सव भरवण्यात आला होता. महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजेच्या सुमारास महोत्सवास सुरवात झाली त्यानंतर अवघ्या अडीच तासांत ग्राहकांनी विविध रानभाज्यांची खरेदी केली. त्यांना माहिती असलेल्या व माहिती नसलेल्या भाज्यांची ओळख करून घेत सर्वांनी खरेदीला महत्त्व दिले
कटूर्ली,अळंबी,आघाडा,अमरकंद,आचकंद,कोवळेबांबू,बांबूचेकोंब,महाळुंग,रानकेळी,रानतोंडले,रानपुदाना,राक्षस,कुसरा,कुई, भुईपालक,घोळ,तरोटा,कुरडू,गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली,फांग, अरवी,तांदुळकुंद्रा,काळा म्हैसवेल, चवळीच्या डेऱ्या,चिवळ,सराटा,बडकी,लोधी,वागोटी, हळंदा,आळूचे पान, समिंद शोक पानं असे विविध प्रकारच्या विविध रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.

नैसर्गिकरित्या रानभाज्या येतात त्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे व रानभाज्यांचे महत्त्व सर्वांना माहिती व्हावे म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरेल. विविध आजारांवर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल. असे आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी सांगितले. रोटरी रेल सिटीचे सचिव अनिल सहानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुयश न्याती यांनी सुत्रसंचलन केले तर प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल सहानी, प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी, सह प्रकल्प प्रमुख हरमीतसिंग माखन, इनरव्हील रेल सिटीच्या अध्यक्षा मिनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ राहुल पांडे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव आदींनी परिश्रम घेतले.

काही रानभाज्यांची माहिती होती पण महोत्सवाच्या निमित्ताने बांबुच्या भाजी विषयी पहिल्यांदाच माहिती झाली. पहाडातल्या आदिवासी लोकांना शहरी भागात आपला माल विकण्याची संधी मिळाली. शिवाय रानभाज्यांचे मोलही समजावून सांगण्यात येत होते. एकंदरीत महोत्सवाचे व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
राहुल वाघ
पोलिस निरीक्षक,
बाजार पेठ पोलिस ठाणे, भुसावळ.

——–