भुसावळ – भुसावळ शहरात कला, साहित्य, संस्कृती अशा नानाविध क्षेत्रात जय गणेश फाउंडेशनने वेगळा ठसा उमटवला आहे. कलाकार व मानवतेचा संदेश देणारी ही एक कार्यशाळा आहे. असे गौरवोदगार मान्यवरांनी काढले. निमित्त होते कार्यकारिणी निवड सभा व ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या गौरव सोहळ्याचे.

सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात गुरूवारी हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे नाट्यलेखक विरेंद्र पाटील तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर होते. विचार मंचावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्या शैक्षणिक, नाटक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील कार्याचा धांडोळा घेतलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सेंट्रल रेल्वे स्कूलचे निवृत्त शिक्षक राजेंद्र जावळे यांनी या पुस्तिकेचे संपादन केले आहे. दरम्यान या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र यावलकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमात कोण काय म्हणाले?
उमेश नेमाडे : जय गणेश फाउंडेशन ही केवळ संस्था नाही. ती एक सामाजिक, सांस्कृतिक चळवळ आहे. नवोदित कलाकार मंडळींसाठी हे हक्काचे व्यासपीठ आहे. शेकडो ज्येष्ठांचे संघटन हेच या संस्थेचे बलस्थान आहे.
प्राचार्य सतीश कुलकर्णी : मला या फाउंडेशने गणेशोत्सवातून मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. त्याचा फायदा निवृत्तीच्या काळात होतो आहे. मालिका, चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या आयुष्याचा धांडोळा घेणारी पुस्तिका मन्वंतरातला ठेवा आहे.
विरेंद्र पाटील : शहरात जय गणेश फाउंडेशन सत्कार्य जे करतात त्यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहते. सांस्कृतिक क्षेत्रात या संस्थेने पथदर्शी काम उभे केले आहे. प्रत्येकाला हेवा वाटावा असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात. त्यातून नवे कलाकार घडत असतात.
आर. आर. बावस्कर : शासकीय नोकरीत असताना फाउंडेशनच्या एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो. त्यात बरेच काही शिकायला मिळाले. निवृत्तीनंतर पूर्णवेळ आता ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाली.


