शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी देणार : मुख्यमंत्री शिंदे : लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावध रहावे : महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

जळगाव,

शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी राज्य सरकार आगामी काळात शंभर कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येर्इल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महिला सशक्तीकरण अभियानाचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार चिमणराव पाटील, राजूमामा भोळे, संजय सावकारे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध आहे. दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर शहरांचा विकास होण्यास मोठी मदत होत असते. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठी आगामी काळात शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येर्इल. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढला जात आहे. शहरातील एमआयडीसी क्षेत्राचा सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून नव्या एमआयडीसीचा सर्व्हे झाला असून उद्योग मंत्र्यांना त्या संदर्भात त्वरीत सूचना दिल्या जातील असेही श्री. शिंदे म्हणाले.

लाडकी बहिण ही योजना सरकारने संपूर्ण तयारी करुन अस्तित्वात आणली आहे. या योजनेला वर्षभरासाठी लागणारा निधी स्वतंत्र काढून ठेवला आहे. विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नसल्याने ते ही योजना बंद करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत. विरोधक तर थेट न्यायालयात जावून ही योजना बंद करण्याची मागणी करीत आहेत. मात्र सरकार कुठल्याही परिस्थितीत ही योजना बंद करणार नाही; उलटपक्षी बचत गटांच्या चळवळीला चालना देवून महिलांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हिंदुस्थान उभा करण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असून त्यावर कठोर मेहनत घेतली जात आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्त व स्वावलंबी करण्यासाठी लखपती दिदी ही योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत देण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैसांचा संसाराला नक्कीच फायदा होणार आहे. ही योजना म्हणजे ‘माहेरचा आहेर’ आहे. या योजनेबद्दल विरोधक अफवा पसरवत असून महिलांनी सावत्र भावांपासून सावध रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत पार पडले. जिल्ह्यातील काही भगिनींनी मान्यवरांना राखी बांधली व एक सन्मानचिन्ह देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक शॉर्ट फिल्म दाखवल्यावर जिल्ह्यातील सर्वांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारकाचे ई भूमीपूजन करण्यात आले.

टांगा पलटी, घोडे फरार होणार : गुलाबराव पाटील

महायुती सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून विरोधक त्यात खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी तळी उचलली आहे, मात्र हे त्रिमुर्तीचे सरकार विरोधकांना पुरुन उरणार आहे. आगामी काळात विरोधकांचा टांगा पलटी… आणि घोडे फरार होणार असल्याची टीका पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख 20 हजार अर्ज भरण्यात आले असून प्रत्येक महिन्याला 78 कोटी तर वर्षाला 940 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. महिला सक्षमीकरणावर महायुतीचे सरकार काम करीत असून विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. नार-पार योजना देखील आगामी काळात राबविण्यात येणार असून शेती सिंचनाखाली आणण्यात येर्इल. चोपडा, यावल तालुक्यातील सिंचन योजनांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध असून विरोधकांच्या भूलथापांना माता-भगिणींनी बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

योजनेसाठी महायुतीला मतदान करा : अजित पवार

महिला, तरुण, शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी या योजनेला अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली असून अर्थमंत्री म्हणून मोठा निधी मी वेगळा काढला आहे. विरोधकांनी विरोधासाठी या योजनेला सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून ते रोज नवनव्या अफवा पसरवित आहेत; मात्र ही योजना महायुतीचे सरकार जोपर्यंत आहे, तो पर्यंत कायम राहणार असून महिलांनी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महायुतीला विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

श्री. पवार म्हणाले की, महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या योजना आणून त्याची अंमलबजावणी देखील केलेली आहे. विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नसल्याने ते लाडकी बहिण योजनेला विरोध करीत असून राज्यात अफवा पसरवित आहेत. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भगिणींना या योजनेसाठी अर्ज करावेत, सरकार कुठलीही योजना बंद करणार नसून केंद्र सरकारने आखून दिलेल्या चौकटीत काम करणार असल्याची ग्वाहीही श्री. पवार यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिली.

वेड्यांनो, भाऊबीज कधी परत घेतात का? : फडणवीस

लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले. कुणाचा बापही लाडकी योजना बंद करू शकणार नाही असेही त्यांनी ठासून सांगितले.

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली. त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असे सांगितले. श्री. फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागले. कुणी म्हणाले लाच देताय का, कुणी म्हणाले मते खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणाले की 1500 रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत. महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही. मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा पैसा परत करतात. 25 तारखेला याच मैदानावर लखपती दिदी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होर्इल असेही त्यांनी सांगितले.

महिलांची लक्षणिय उपस्थिती

लाडकी बहिण योजनेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांचे मान्यवरांसोबत आगमन होताच महिलांनी मोबार्इलची टॉर्च लावून त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी महिलांवर पुष्पवृष्टी करीत त्यांना अभिवादन केले. आकाशवाणी चौकातून मंत्र्यांनी उघड्या जीपमधून सभास्थळ गाठले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्वत: रस्त्यावर उतरले होते.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात

लाडकी बहिण योजनेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळी येत असतांना एस्कॉटमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांवर आदळली. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच झाली अपघाताची घटना घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी नाही मात्र यात पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.