रानभाज्यांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या : वैद्य राहुल पांडे


भुसावळ दि . १४ : फवारणी मुक्त नैसर्गिक रानभाज्यांचे औषधी गुणधर्म अनेक आहेत ते प्रत्येकाने जाणुन घ्यावे.‌ त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे मत आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य राहुल पांडे यांनी व्यक्त केले. येत्या रविवारी (ता. १८) भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूल मध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर ते माहिती देत होते.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी येथे विविध रानभाज्या घेऊन येणार आहेत. वैद्य पांडे म्हणाले साधारणतः पावसाळा किंवा श्रावण महिना सुरु झाला की रानभाज्यांची चर्चा सुरु होते. माळरानावर, जंगलामध्ये, डोंगरावर विविध रानभाज्या दिसू लागतात. प्रामुख्याने आदिवासी बांधवांना या रानभाज्यांची चांगली माहिती असते.
कोणतेही बी बियाणे न पेरता, खते, कीटकनाशके न वापरता आपोआप उगवणाऱ्या या वनस्पती असतात यांना रानभाज्या म्हणून संबोधले जाते. या रानभाज्यांची नीट ओळख करून मगच त्या वापराव्यात काही रानभाज्या शरीराला नुकसान देखील करू शकतात.
आपल्याकडे प्रामुख्याने तरोटा, घोळ, चवई, माठ, कर्टूले, कुर्डू, दोडी फुल, शेवगा, चाकवत, शतावरी, पाथरी, गुळवेल, भोकर ई. रानभाज्या आढळतात. या प्रत्येक भाजीचे गुणधर्म वेगवेगळे असतात. या रानभाज्या विविध खनिजे, जीवनसत्वे, लोह यांनी समृद्ध असतात. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून यांचे गुणधर्म जाणून घेऊन मग यांचे सेवन करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदामध्ये या विविध भाज्यांचा आहारात वापर कसा करावा यांचे वर्णन आहे. उदा. पालेभाज्यांचा वापर करतांना त्या पहिले उकळून घेऊन मग पिळून त्यानंतर फोडणी करून खाव्यात. सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे या रानभाज्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे त्यामुळे यांचे संरक्षण व संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. असे पांडे म्हणाले.‌