मोक्षप्राप्तीसाठी पंढरपूरला जाण्याचा संतांनी केलेला उपदेश कल्याणकारी – हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांचे प्रतिपादन : शेगाव येथील श्रींच्या दरबारात पार पडली कीर्तन सेवा

भुसावळ – आपल्या भारतात अनेक तिर्थक्षेत्रे असून आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी पंढरपूर तिर्थक्षेत्री जाण्याचा उपदेश केलेला आहे. हा उपदेश मनुष्य जन्माचे कल्याण करणारा आहे. त्यामुळे विठूरायाचे दर्शन करण्यासाठी आपण पंढरपूरला जायलाच हवे, असे प्रतिपादन हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी केले.

शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानात श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करताना ते म्हणाले की, संतांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत. आपल्या जीवनाचे कल्याण व्हावे यासाठी त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. मनुष्य जन्माला येण्याचे सार्थक म्हणजे मोक्षप्राप्ती होय. ही मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी देवाचे नामस्मरण व कीर्तन करणे आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूर येथील श्रीविठूरायाच्या दर्शनाने किंबहुना पंढरपूर येथील मंदिराचा फक्त कळस पाहिल्याने मोक्ष मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने पंढरपूरला जायलाच हवे. कारण पंढरीचा विठूराया हा प्रत्येक भाविकाची आतुरतेने वाट पाहत उभा आहे. तो आपल्या भक्तांना भेटण्यासाठी उतावीळ झाला आहे. त्यामुळे आपणही लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी वर्षातून किमान एकदा पंढरपूर जायलाच हवे. संतांनी देखील पंढरपूर क्षेत्राचे महत्त्व वर्णन केलेले आहे. तसेच संत निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू व गुरू होते. त्यांनी केलेल्या गुरूपदेशामुळे ज्ञानाची गंगा आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यामुळे संत निवृत्तीनाथांचे आपल्यावर प्रचंड उपकार असल्याचेही हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी आपल्या कीर्तनात सांगितले. कीर्तनाच्या समारोपानंतर चंद्रकांत महाराज यांनी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. मंदिरातर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत भुसावळ येथून मुरलीधर लोखंडे, सुरेंद्रसिंग पाटील, डॉ. जगदीश पाटील, सचिन माळी उपस्थित होते.

श्रींच्या दरबारात लाभले कीर्तनसेवेचे भाग्य

श्रीसंत गजानन महाराज मंदिर संस्थानची थोर परंपरा आहे. वारकरी संप्रदायात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. वर्षभरात प्रासंगिक वेळेला अनेक कीर्तनकारांची कीर्तन मंदिरात होत असतात. यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रींच्या दरबारात आयोजित किर्तन सेवेचा योग वाट्याला आल्याचे भाग्य लाभले असल्याचे हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी सांगितले.