भुसावळ : लहानपणी अंगा-खांद्यावर तुम्हाला खेळवणारा बाप जेव्हा मुलगी 20 वर्षांची होते तेव्हा तिच्या मुक्तपणे वावरण्यावर काही अंशी निर्बंध आणतो मात्र म्हणून तुम्ही चुकीचे पाऊल उचलणार आहात का पोरींनो ?…असा प्रश्न उपस्थित करीत हंकारे म्हणाले की, तुम्ही ज्यावेळी लग्न मंडपातून तुमच्या नवर्याच्या घरी जातात, त्यानंतर घरी येऊन आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घरातील तुमच्या वस्तू पाहून ढसाढसा रडणारा असतो तो तुमचा बाप असतो त्यामुळे पोरींनो ‘लय अवघड हाय गड्या समजाया बाप रं’..! अशी भावनिक साद घालत प्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांना घालत अश्रूंना मोकळी वाट करून दिली. निमित्त होते ते भारत विकास परीषदेतर्फे आयोजित ‘आई- बाप समजून घेताना व चला जगूया आनंदाने’ व्याख्यानाचे !
शनिवार, रोजी सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील जय मातृभूमी चौकात भारत विकास परिषदेच्या माध्यमातून झालेल्या व्याख्यानप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, खासदार रक्षा खडसे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सतीश खडाईगे, प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कुटुंबावर येणार्या प्रत्येक संकटाचा सामना तोच करतो… तो बाप नसतोच कुणाच्या ध्यानीमनी, अशी भावनिक साद घालून प्रबोधनकार वसंत हंकारे म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आई विषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो पण वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते पण याचा अर्थ हा नाही की ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा वडिल व्यक्त होत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करीत नाही. आयुष्यात वडिलांचे स्थान खूप मोठे आहे त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करणे किंवा प्रेम व्यक्त करणे खूप गरजेचे असल्याचे हंकारे म्हणाले.

पोरींनो बापाला मान खाली घालण्याची वेळ आणू नका…!
व्याख्याते हंकारे यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीपासूनच उपस्थित विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठाव घेतला. आपल्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्वाचे आहे, आपली आई आपल्याला जन्म देण्यापासून मोठे करण्यापर्यत किती वेदना आणि कष्ट झेलते याची प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक असल्याचे हंकारे म्हणाले. मोबाईल आणि सोशल मिडियामुळे तुम्ही तुमच्या आई-वडिलांपासून दुरावत चालला असल्याची जाणीव हंकारे यांनी करून दिली. वयात आल्यानंतर मुलींनो चुकीचा निर्णय घेवून वाघासारख्या बापाला मान खाली घालण्याची वेळ आणू नका, असे भावनिक आवाहन हंकारे यांनी करताच मुलीही गहिवरल्या.
तेव्हा बाप जिवंतपणीच मरतो !
पसमाजातील मुलींचे पळून जाण्याच्या घटनांवर प्रकाश टाकताना हंकारे म्हणाले की, लाडा-कोडाने वाढवलेली मुलगी कुणाच्या तरी प्रेमात पडते व आई-बापाला नकळत सोडून पळून जाते तेव्हा बाप जिवंतपणीच मरतो, चितेवर जरी त्याला अग्निडागाने जाळले तरी तो विचारांनी जिवंत राहतो त्यामुळे मुलींनो आई-बापाची मान शरमेने खाली जाईल, असे कदापि वागू नका, जोवर श्वास सुरू आहे तोवर आई-बापांवर प्रेम करा… एकदा त्यांचा श्वास निघाला तर फोटो फ्रेममधून ते बाहेर येणार नाहीत, असेही हंकारे यावेळी म्हणाले.
मुलीच नव्हे तर पालकही अक्षरशः धाय मोकलून रडले !
पदिड तासांच्या व्याख्यानानंतर समारोपप्रसंगी हंकारे यांनी काही मुलींच्या पालकांना स्टेजवर बोलावले व त्यानंतर पालकांच्या मुलींनाही व्यासपीठावर बोलावत त्यांना आपल्या वडिलांना मिठी मारायला लावताच मुलींसह त्यांचे पालक धाय मोकलून रडले तर हे भावनिक दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी मुला-मुलींना हंकारे यांनी कुठलाही निर्णय चुकीचा घेणार नाही, आई-वडिलांची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य करणार नाही, अशी शपथ दिली. यावेळी अनेक मुलींनी मनोगतात आजच्या व्याख्यानामुळे आमचा ‘बाप’ आज आम्हाला कळाला, आयुष्यात कदापि चुकीचा निर्णय घेणार अशी कबुली देत हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही मुलींनी आम्हाला वडिल नाहीत, असे सांगून अश्रूंना वाट मोकळी करून देताना आम्ही कुणाला मिठी मारायची ? असा प्रश्न अंतर्मुख करणारा प्रश्न उपस्थित केल्यानंतर हंकारे यांनी या सर्व मुलींना प्रेमाने जवळ घेत कडकडून मिठी मारल्याने उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहतच राहिल्या.


