भुसावळ, ता. २९ : माणसातला देव ओळखण्याचा संदेश देणाऱ्या ‘वारी’ या बालनाट्याच्या सादरीकरणाने १४ व्या खान्देश नाट्य महोत्सवाची सुरुवात झाली. उत्कर्ष कलाविष्कार आयोजित व ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृती निमित्त या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन ओबेनॉल फाऊंडेशनचे संजयसिंग परदेशी यांच्या हस्ते नाटकाची घंटा वाजवून झाले. यावेळी अंजली परदेशी, ज्येष्ठ नागरीक व व्यापारी पंडितराव सुरवाडे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा
रजनी सावकारे, संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, न्यु जवाहर डेअरीचे संचालक सुरेश पाटील, आनंद ड्रेसेसचे संचालक सुनिल जैन, मल्हार हॉटेलचे संचालक प्रमोद धनगर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी मोहन फालक म्हणाले की महोत्सवातुन मनोरंजना बरोबरच अंतर्मुख करणाऱ्या नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार असल्याने त्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल. सुनील जैन म्हणाले नाटक ही जिवंत कला असुन समाजाला दिशा देण्याचे काम करते. ही कला जिवंत ठेवण्यासाठी नाट्य कलावंतांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे आवश्यक आहे. रजनी सावकारे यांचे देखील भाषण झाले. नटराज पुजन व नानासाहेब फालक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण मान्यवरांनी हस्ते करण्यात आले. प्रसिद्धी प्रमुख सुशील पाटील यांनी सुत्रसंचालन तर अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर

वरणगाव येथील चाटे पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘वारी’ हे बालनाट्य सादर केले. यात तब्बल ४४ पेक्षा जास्त बाल कलावंत सहभागी झाले होते. या नाटकाचे निर्मीती प्रमुख राहुल सोनार तर दिग्दर्शक अजय पाटील होते. विठ्ठल दर्शनासाठी दरवर्षी पंढरपूर कडे निघणाऱ्या वारीकडे नकारात्मक व सकारात्मक दृष्टिकोनातुन पाहतांना माणसात असलेला देव ओळखा असा संदेश या बालनाट्यातुन देण्यात आला. त्यानंतर हनुमान सुरवसे लिखीत व उमेश गोरधे दिग्दर्शीत उत्कर्ष कलाविष्कारची ‘सेल नसलेला रेडिओ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. पैश्या पेक्षा आपले कुटुंब आपली माणस जास्त महत्वाची असतात हा संदेश या एकांकिकेतुन देण्यात आला. सायंकाळी पुण्याच्या आजकल संस्थेचे ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ व नाशिकच्या स पा न या संस्थेचे ‘तो राजहंस एक’ हे नाटक झाले.सादर होईल. तर उद्या (ता. २) संध्याकाळी ‘व्हाया सावरगाव खुर्द’ व टायनी टेल्स थिएटर निर्मित ‘कडेकोट कडेकोट’ ही दोन नाटके सादर होतील.
चौकट :
भविष्यात ओबेनॉल नाट्यगृह उभारणार !
भुसावळ मध्ये नाट्यगृह व्हावे म्हणून शासनदरबारी कलावंत व रसिकांनी अनेकदा निवेदने दिली. राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासना पलिकडे काही दिले नाही. अखेर दहा वर्षापासून ही मागणी करणेच सोडून दिले. मात्र आज अनिल कोष्टी यांनी आपल्या प्रास्ताविकात ओबेनॉल फाउंडेशनचे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांचा फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात नाट्यगृह बांधण्याचा विचार असल्याचे सांगताच उपस्थित कलावंतांना सुखद धक्का बसला.
—————


