भुसावळ शहरातील ११ हजार ग्राहक मुदतपूर्व भरणा सुटीतून वंचित….. महावितरणच्या भोंगळ कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

भुसावळ शहरातील घरगुती, व्यापारी तसेच उद्योगिक ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्याचे सुरूच असताना आता ११,००० ग्राहक मुदतपूर्व भरणा सुटीतून वंचित राहणार आहे, कारण या सर्व ग्राहकांना मुदतपूर्व भरणा सुटीच्या दिनांकानंतर वीज देयके मिळालेली आहेत. शहरातील उर्वरित ग्राहकांना देयके मिळाली नसल्याने त्यांनी देयकासाठी महावितरण कार्यलयात गर्दी केली आहे. मागील महिन्यात ९ हजार ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज देयके मिळवली होती. वारंवार मीटर रिडींग एजन्सीच्या तक्रारी वरिष्ठ स्तरावर करूनही महावितरण अधिकारी कॉन्ट्रॅक्टरच्या चुकांवर पांघरून घालत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभाराची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

महावितरणचा लाखो रुपयांचा फायदा;

शहराच्या जळगाव रोड भागात १३ डिसेंबर २०२२ रोजी देयके तयार झाली. २२ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतपूर्व भरणा केल्यास ग्राहकांना ३० ते ४० रुपयांची सूट मिळणार होती, ज्या ग्राहकांचे वीज देयक २ हजरापेक्षा जास्त असल्यास त्यांना ५० ते ६० किंवा जास्त रक्कमेची सुट मिळाली असती परंतु ग्राहकांना वीज देयके २२ डिसेंबर २०२२ रोजी मिळाली. त्यामुळे  ग्राहक या सूट पासून वंचित राहिले आहेत. भुसावळ शहराच्या या भागातून साधारण ५ ते ८ लाख रुपये महावितरणचा फायदा झाला असावा अशी माहिती मिळत आहे. शिवाय शहराच्या इतर भागात वीज देयके वाटपच झाली नाहीत. अनेक ग्राहकांना विलंब शुल्क भरावे लागेल.  

ग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात;महावितरणच्या कार्यालयात देयके घेण्यासाठी रांग लागली आहे. अनेक वेळा चुकीचे रिडींग दिले जाते म्हणून मोबाइलवर आलेल्या अवाजवी देयकांवर नागरिकांचा विश्वास नाही. देयकात चूक असल्यावरही वीज देयक भरणा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देतात, मात्र रिडींग एजन्सीवर कोणतीही कारवाई केली जात नाही याचे आश्चर्य वाटते. महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्व सामान्य ग्राहक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, असे प्रा. पाटील यांनी कळविले आहे.