इंदौर : इंदौरहून पुण्याकडे निघालेली अमळनेर एस.टी.महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने 13 प्रवासी ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे तर या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवार, 18 रोजी सकाळी हा मोठा अपघात झाला. दरम्यान, मयतांपैकी आतापर्यंत आठ पुरूष, चार महिला व एका बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

नियंत्रण सुटल्याने बस कोसळली नदीत
आग्रा-मुंबई महामार्गावरील इंदौरपासून 80 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला असून महाराष्ट्रातील अमळनेर आगाराची ही बस इंदौरहून पुण्यात जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या पुलावर अपघात घडला त्या पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) तर अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये येतो. क्रेनच्या मदतीने कोसळलेली बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे तर काही प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी 15 प्रवाशांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. अनेक मृतदेह वाहून गेल्याची भीती आहे तर स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी धडपड केली.
अपघातापूर्वी हॉटेलवर थांबली बस
अमळनेर आगाराची इंदौर-पुणे बस (एम.एच.40 9848) ही सोमवारी सकाळी नऊ वाजता खलघाटजवळील दुध बायपासजवळ एका हॉटेलवर नास्ता करण्यासाठी थांबली होती व त्यावेळी काही प्रवाशांना नास्ताही केला मात्र त्यानंतर थोड्याच वेळात बस अनियंत्रीत झाल्याने पुलाखाली कोसळल्याने 13 प्रवासी ठार झाले तर अनेक बेपत्ता असून मृतांचा आकाडा वाढण्याची भीती आहे.


