रायगड – : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. रायगड न्यायालयात त्यांना मंगळवारी रात्री हजर केल्यानंतर पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयात ही मागणी फेटाळून लावत राणे यांची जामिनावर सुटका केली. नारायण राणे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला.

पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची
नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलीस तपासासाठी दिलेली कारणेदेखील योग्य नाहीत. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही, असा युक्तिवाद नारायण राणे यांच्या वकीलांनी यावेळी न्यायालयात केला.
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी झाली होती अटक
रायगडमधील महाड येथे झालेल्या पत्रकार परीषदेत राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसर्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. ‘आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणार्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती’ असं नारायण यांनी म्हटल्यानंतर राज्यात मोठे वादंग निर्माण झाले होते.


