तापीतिराची राखी पोहोचली गोदावरी व इंद्रायणीतिरी ; मेहूणच्या मुक्ताईंची राखी आळंदी, त्र्यंबकेश्‍वर व सासवडला अर्पण ;

भुसावळ – संपूर्ण जगाला मानवतावाद देणार्‍या लहानग्या भगिनीचे बंधूप्रेम आजही जोपासण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण येथील देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून इंद्रायणीतिरी श्रीक्षेत्र आळंदी, गोदावरीतिरी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि इंद्रायणीतिरी श्रीक्षेत्र सासवड अशा तिन्ही ठिकाणी राखी पाठविण्यात आली.
आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्व आहे. त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम हा सण करतो. महाराष्ट्रात बाराव्या शतकात अवतार घेतलेल्या संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई या चारही भावंडांनी साहित्य व अध्यात्मिक क्षेत्रात क्रांती केली. मुक्ताईंचे बंधूप्रेम संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हेच बंधूप्रेम सातशे वर्षानंतरही जपण्याचे काम रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील देवस्थानतर्फे केले जात आहे. मेहूण तापीतीरी संत मुक्ताईंच्या चरणी राख्या ठेवल्यानंतर या राख्या श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्रीक्षेत्र सासवड येथे श्रीसंत सोपानदेव महाराज यांच्याकडे पाठविल्या. तेथे पोहोचल्यावर माऊली पांडे महाराज, बापू लवंगे महाराज, मनोहर अवचट महाराज, गजानन कुळकर्णी, भागवत चौधरी, शीतल चौधरी, माऊली चौधरी, आदिश्री चौधरी आदींनी तीनही भावडांच्या समाधीस्थळावर राखी अर्पण केल्या. आदिशक्तीची राख्या तीनही भावडांना अत्यंत आदरपूर्वक व सन्मानाने प्रदान करण्यात आली. 

मुक्ताईदी भावंडांचे अतूट बंधन प्रेरणादायी – हभप शारंगधर महाराज

संत मुक्ताई व संत ज्ञानेश्‍वर यांचे भाऊबहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. रक्षाबंधनाच्या माध्यमातून भावाबहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन जोपासण्याचे काम संत मुक्ताई देवस्थान श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर यांच्या वतीने करण्यात येत आहे. अध्यात्माची परमोच्च पातळी गाठलेल्या बहिणी-भावाच्या प्रेमाची आठवण आजही रक्षाबंधनाच्या माध्यमातून जोपासली जात आहे. राखी पाठवून आजही संत मुक्ताई आपल्या तीनही दादांना राखी पाठवत असल्याची परंपरा उल्लेखनीय आहे. ही परंपरा याहीपुढे निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही मेहूण संस्थानचे विश्वस्त तथा श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष हभप शारंगधर महाराज यांनी सांगितले.