भुसावळ – तालुक्यातील कुर्हेपानाचे येथील आदर्श हायटेक आयटीआयमध्ये चिखली-तरसोद महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या वेल्सस्पुन ग्रुप कंपनीत कार्यरत अभियंते आणि आयटीआयमधील विद्यार्थी असा संवादाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यात कंपनीचे एचआर डिपार्टमेंट मुख्य श्यामलाल यांनी, कौशल्य व आत्मविश्वास असेल तर स्वत:च्या प्रगतीसाठी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला. या कार्यक्रमात अभियंते आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रश्नोत्तरे केली. अभियंत्यांनी त्यांचे वैयक्तिक जीवन, अभियंत्यांची लाइफस्टाइल, आयुष्यात कसे पुढे जायचे? हायवे बांधकामांबद्दल माहिती दिली. त्यातील तांत्रिक प्रक्रियेची देखील माहिती दिली.

विविध खेळांचे आयोजन
यानंतर मटकी फोड, सुई-धागा, संगीत-खुर्ची, बुद्धिबळ, कॅरम इत्यादी खेळ खेळले गेले. त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. महत्त्वाचे म्हणजे उपस्थित अभियंत्यांपैकी बहुतेक बाहेरील राज्यातील होते. एचआर डिपार्टमेंटचे मुख्य श्यामलाल यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या चांगल्या भविष्यासाठी घराबाहेर पडावे. तुमच्यात कौशल्य आणि आत्मविश्वास असल्यास तुम्ही कुठेही काम करू शकतात, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेच्या वतीने जे.टी.महाले, एस.एस.कुलकर्णी, के.जे.राणे, व्ही.एन.राणे, एम.आर.नरवाडे, जी.एस.महाजन, पी.पी.चौधरी, एम.पी.कुरकुरे यांनी मेहनत घेतली. प्राचार्य एस.के.कुरेशी आणि आर.बी.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभियंत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती
वरीष्ठ इंजिनिअर आरएआर संतोषकुमार, वेदवीर सिंग, डी.के.परिडा, बिरंकर रॉय, सहायक व्यवस्थापक (तांत्रिक अभियंता) अब्दुल समद, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी असीम अडगिरी, निताई विश्वास, स्ट्रक्चर सिनिअर इंजिनिअर सिद्धार्थ सेनापती, क्वालिटी सिनिअर इंजिनिअर सुमित दास, सीएसआर ऑफिसर नम्रपाली गोंडाणे आदी उपस्थित होते. या सर्वांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना स्वत:चे अनुभव कथन केले.


