भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून याचाच भाग म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र केंद्राकडून ही लस पुरेशी उपलब्ध होत नसल्याने हे लसीकरण वारंवार ठप्प होत आहे. लसअभावी शहरातील लसीकरण चार पाच दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असून ही लस कधी उपलब्ध होईल याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध होत नसल्याने काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. भुसावळकरांना मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी जेणे करून लसीकरण सुरळीत होईल अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांना शिवसेना भुसावळ शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केली आहे.

कोरोनावर परिणामकारक असणारी प्रतिबंधक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. यात शहरात पाच ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र सुरू सुरू आहेत. या सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. मात्र लसीच्या पुरेशा उपलब्धतेअभावी लसीकरण वारंवार ठप्प होते आहे. गेल्या आठवड्यात लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने दिवसभरात केवळ एक ते दोन तास लसीकरण होत होते, तर गेल्या चार दिवसांपासून हे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. पर्यायाने शहरातील लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरीकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्याकडे केली होती.
आधी रेमडेसिव्हिर नाही; आता लस नाही
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहर सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसून येते आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक दिसून येत असताना परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीही काम करीत आहेतच. आधी कोरोनाबधितांना बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, त्यानंतर रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आता लसीकरण सुरू झाले असताना लस मिळत नाही. एकूणच सर्वच बाबतीत केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे हाल होत असून यात गांभीर्याने लक्ष घालून शहरवासीयांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.


