भुसावळ –
भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. दररोज ब्लास्टींग करुन गौण खनिज काढले जात असल्याने परीरसरातील रहिवासी गावांतील घरांना हादरे बसत आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक संपत्तीची लूट केली जात आहे. याबाबत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
बेलव्हाय परीसरातील गट नंबर 20 मध्ये अवैध गौण खनीज काढून वाहतक केली जाते. दगड फोडण्यासाठी दररोज अवैध ब्लास्टींग होत आहे. इनामी जमिनीवरही अशा प्रकारे गौण खनिज काढून साधन संपत्तीची लूट केली जात आहे. ब्लास्टींगमुळे गावातील घरांना तीव्र हादरे बसत आहेत. या ब्लास्टींगमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची दाट शक्यता वाढली आहे तसेच रस्त्याच्या बाजूने खोदकाम होऊन खदान झाल्यामुळे पाणी साचून रस्ताही वाहून जाण्याची भीती आहे. या प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय व प्रांताधिकार्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करुनही या खोदकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. राजकीय वरदहस्त असल्याने दररोज उत्खनन सुरुच आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या अनुसुचित जाती जमातीचे कार्याध्यक्ष विवेक नरवाडेंसह काही ग्रामस्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडेही तक्रार देण्यात आली असून या प्रकरणी बेलव्हाय गावात काही जिवित हानी झाल्यास महसूल प्रशासन जबाबदार रहिल, असेही नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
बेलव्हायसह तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे. महसूल विभाग मात्र केवळ झोपेचे सोंग घेत आहे. अनेक तक्रारीनंतरही कारवाई होत नाही. इनामी व अटी शर्तीच्या जमिनीवरही खोदकामे होत आहे. एमआयडीसीत सपाटीकरणाच्या नावाखाली अवैध उत्खनन सुरु आहे. राजकिय व अधिकार्यांच्या कृपार्शिवादामुळे सध्या हे प्रकार वाढले आहेत



