नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यासक्रमावर भर: डॉ.राहुल बारजिभे इंजिनिअरिंग शिक्षणात डीबाटुचे आमूलाग्र बदल…


भुसावळ (प्रतिनिधी )-
इंजिनिअरिंग शिक्षणाला साचेबद्ध शिक्षण प्रणालीच्या ठराविक चौकटीतून मोकळे करून, कौशल्य आधारित शिक्षण प्रवाहात आणणं, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवून उद्योग आणि स्टार्टअप मधून राष्ट्रसंपत्ती निर्माण करणं हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य गाभा आहे. या मुख्य भूमिकेला अनुसरून डीबाटूने म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेनी काळ सुसंगत पावले उचलली आहेत.
आजच्या काळाची गरज ओळखून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अपेक्षित असणारे, औद्योगिक जगताला लागणाऱ्या अद्ययावत ज्ञानाचा समावेश करणारे, नोकरी बरोबरच स्टार्टअप, उद्योग उभारणारे शिक्षणचा अंतर्भाव विद्यापीठ अभ्यासक्रमात केला आहे. त्याचबरोबर अवांतर ज्ञानाच्या कक्षा खुल्या करून स्वतःच्या आवडी निवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य देणारी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानंकानी शिक्कामोर्तब केलेली ऑनर्स व मायनर डिग्री या कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे अशी माहिती श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डीबाटूचे कार्यकारी समितीचे सदस्य डॉ.राहुल बारजिभे यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इंजिनिअरिंग शिक्षणात बदल करण्यात आले आहे, त्याविषयी महाविद्यालयाच्या अकॅडेमिक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह, डॉ.पंकज भंगाळे, डॉ.सुधीर ओझा, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ.दिनेश पाटील, प्रा.अजित चौधरी उपस्थित होते.
ऑनर्स व मायनर या कार्यपद्धतीचा अवलंब करणारे डीबाटू हे देशातील पहिले तंत्रशास्त्र विद्यापीठ असणार आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळेच इंजिनिअरिंग विश्वाचे लक्ष डीबाटूकडे वेधले गेले आहे. इंजिनिअरिंग शिक्षण बदलत आहे व हे सर्व शक्य होत आहे ते महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे, तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय. जगामध्ये बहुतांश देशांमध्ये पारंपरिक विद्यापीठ सोडून वेगळी तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. किंबहुना भारतातील कित्येक राज्यांमध्ये स्वतःची तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. महाराष्ट्र शासनाने इतर राज्यांच्या धरतीवर स्वतंत्र तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन केले. आजमितीला राज्यातील शंभराहून अधिक डीबाटू विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या नवीन बदलांचा फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.
काय आहे ऑनर्स व मायनरचे मॉडेल?
इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतल्यानंतर बरेचदा दोन प्रकारचे अनुभव येतात. साधारणपणे काही विद्यार्थ्यांनी निवडलेली शाखा आणि विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल असलेली विद्याशाखा यांच्यात ताळमेळ साधणे शक्य होत नाही. परंतू शाखा बदलणे शक्य होत नाही. अशावेळी त्या विद्यार्थ्याची मानसिक कुचंबणा होते. या उलट काही विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम गती असते अशा विद्यार्थ्यांना त्याच विद्या शाखेतील ॲडव्हान्सड विषय आत्मसात करण्याची संधी मिळत नाही. या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या गरजे नुसार त्यांना अनुक्रमे मायनर व ऑनर्स डिग्री घेण्याची सुवर्णसंधी डीबाटू मध्ये मिळू शकते. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिकक्समध्ये इंटरेस्ट आहे पण त्याची शाखा मेकॅनिकल आहे. त्याला कॉम्युटर इंजिनिअरिंगमधील 5 विषय ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करून बी.टेक इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग विथ मायनर इन इलेक्ट्रॉनिकक्स इंजिनिअरिंग अशी डिग्री मिळते. तसेच ज्या विद्यार्थाला अभ्यासात गती आहे त्याला त्या शाखेतील ॲडव्हान्स 5 विषय ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करून ऑनर्स डिग्री मिळते. जसे बी. टेक इन सिव्हिल इंजिनीरिंग विथ हॉनर्स इन इनवोर्नमेंट अशी ऑनर्स डिग्री मिळते. मायनर व ऑनर्सची सुरूवात या शैक्षणिक वर्षापासून करण्यात आली आहे.
ऑनर्स व मायनर डिग्री असणारे जगातील टॉप विद्यापीठ :
जगातील टॉपच्या विद्यापीठात युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोईस, पर्ड्यू युनिव्हर्सिटी, जॉर्जिया युनिव्हर्सिटी, टॅक्स कॅलिफोर्निया व पेन्सिलविनिया युनिव्हर्सिटी अश्या विद्यापीठात या मॉडेलची यशस्वी अमलबजावणी होत आहे.
एक सेमिस्टरची अनिवार्य इंटर्नशीप :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण पद्धतीमध्ये एक संपूर्ण सेमिस्टरची इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसाठी जसे एक वर्ष इंटरंशिप असते त्याच आधारावर इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा पद्धतीची इंटरंशिप अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या सत्रातील सहा महिने विद्यार्थ्याला कंपनीमध्ये जाऊन प्रोजेक्टवर प्रत्यक्ष काम करून रिपोर्ट सबमिट करावा लागतो. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या त्याच कंपनीत निवड होण्याच्या संधी वाढतात व त्या किंवा तत्सम कंपनीमध्ये त्याची नेमणूक होऊ शकते. इंटरंशिपमुळे नोकरीच्या संधी प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात. या वर्षी अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थींना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली.
तात्काळ फेरपरीक्षेची सुविधा :
रिमेडियल एक्झाम अर्थात तात्काळ फेरपरीक्षा हे डीबाटूचे ठळक वैशिष्ट्य आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या वर्ष वाया जाण्याचे अनेक उदाहरणे आपण ऐकत असतो. परंतु डीबाटूमध्ये तात्काळ रेमेडियल एक्झाम असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला केवळ पंधरा दिवसातच पुन्हा त्या परीक्षेला सामोरे जाता येते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्याच्या नोकरीच्या संधी कायम राहतात. अवघ्या पंधरा दिवसात तात्काळ फेरपरीक्षा होत असल्यामुळे नापास होण्याची भिती नाही. तात्काळ फेरपरीक्षा ही ऑटोनॉमन्स (स्वायत्ता) संस्था आय.आय.टी व एन.आय.टी. अशा संस्थांमध्ये गेली कित्येक वर्ष घेतली जात आहे. यामुळे आपल्या पास/ नापासात अडकलेली शिक्षण पध्दती व त्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास खुप मदत होत आहे. बाटूच्या सुरूवातीपासूनच फेरपरीक्षा घेण्यात येत आहे.
बाटूने घेतलेले मायनर डिग्री/ ऑनर्स डिग्री/ इंटर्नशीप तसेच फेरपरीक्षांचे निर्णय हे नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असून आज होऊ घातलेल्या इंडस्ट्री 4.0 या औद्योगिक क्रांतीसाठी लागणारे अभियंते घडवणारे निर्णय आहेत. देशातील इतर तंत्रशास्त्र विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठांनी यांचे अनुकरण करण्यासारखे आहे. डीबाटूचे कुलगुरू डॉ. रामा शास्त्री यांच्या कुशल नेतृत्व व प्रचंड अनुभवामुळे डीबाटू एक अग्रगण्य तंत्रशास्त्र विद्यापीठ होत आहे असे डॉ.गिरीष कुळकर्णी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *