भुसावळमध्ये कार्यालयीन पत्रव्यवहारात ‘गाव कामगार तलाठी’ उल्लेख टाळण्याची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ ग्राम महसूल अधिकारी संघटनेने कार्यालयीन पत्रव्यवहार व कागदपत्रांवर ‘गाव कामगार तलाठी’ असा उल्लेख करू नये, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेने भुसावळचे मा. उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांना निवेदन दिले आहे.

 संघटनेच्या म्हणण्यानुसार, नगर भूमापन हद्दीतील बिनशेती वापराच्या मिळकतींच्या मालकी हक्काची दुहेरी नोंद पद्धत बंद करण्यासाठी नगर भूमापन योजना लागू झालेल्या सर्व नंबर/प्लॉट नंबरची यादी सादर करण्याबाबत तहसील कार्यालय, भुसावळकडून कार्यालयीन WhatsApp ग्रुपवर पत्र प्राप्त झाले होते. या पत्रामध्ये ‘गाव कामगार तलाठी’ असा उल्लेख करण्यात आल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार महसूल विभागातील ‘तलाठी’ पदाचे पदनाम बदलून ‘ग्राम महसूल अधिकारी’ करण्यात आले आहे. या शासन निर्णयाला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असतानाही कार्यालयीन पत्रव्यवहार व कागदपत्रांमध्ये ‘गाव कामगार तलाठी’ असा उल्लेख होत असल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

 यापुढे कार्यालयामार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारात, कागदपत्रांवर तसेच प्रशासकीय कामकाजात शासनाने निर्धारित केलेले ‘ग्राम महसूल अधिकारी’ हेच पदनाम वापरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत योग्य सूचना देऊन चुकीच्या पदनामाचा उल्लेख कार्यालयीन कामकाजात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती भुसावळ ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तायडे, सचिव मिनाक्षी मुन्ने आणि जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी मंगेश पारिसे यांनी केली आहे.