भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्यांसह कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी रेल कामगार सेनेच्या भुसावळ विभागाच्या शिष्टमंडळाने रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली येथून आलेले सदस्य विवेककुमार गुप्ता यांची भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. रेल कामगार सेनेतर्फे भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा, जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, लार्जेस स्कीम सुरू करण्यात यावी, तसेच एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या जेएसएसईंच्या बदल्या करण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच रेल्वे रुग्णालयात त्वचारोग तज्ज्ञ तसेच नाक, कान, घसा (ईएनटी) तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडल कार्याध्यक्ष प्रितम टाक, संयुक्त सचिव विनोद वाघे, उपाध्यक्ष अरविंद थोरात, पीओएच सचिव मुकेश महाजन, एमओएच अध्यक्ष रुपेश तायडे, एमओएच उपाध्यक्ष मोहन राजपूत यांच्यासह रेल कामगार सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो कॅप्शन : रेल्वे बोर्ड सदस्य विवेककुमार गुप्ता यांना निवेदन देताना ललितकुमार मुथा, प्रितम टाक, विनोद वाघे, अरविंद थोरात, मुकेश महाजन, रुपेश तायडे, मोहन राजपूत आदी.


