रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या सक्त सूचना ; ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल; कामाची तात्काळ चौकशी व तांत्रिक तपासणी करण्याचे प्रशासनाला निर्देश

रावेर (प्रतिनिधी)- : रावेर तालुक्यातील रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार अमोल जावळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित प्रशासनाने रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करून गुणवत्तेची तपासणी करावी, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या आहेत.
रावेर व मुक्ताईनगर या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे काम शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्याने या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जळगावचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, रस्त्याची जाडी, मजबुतीकरणाची प्रक्रिया, डांबरीकरणासह इतर तांत्रिक बाबींची सक्षम अधिकाऱ्यामार्फत तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तपासणीदरम्यान कामामध्ये त्रुटी किंवा गुणवत्तेच्या बाबतीत कमतरता आढळून आल्यास संबंधितांकडून आवश्यक ती पूर्तता करून घ्यावी. तसेच रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित निकषांनुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून घेण्यात यावे, असे निर्देशही आमदार जावळे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे,” अशी भूमिका आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली आहे.