भुसावळ विभागाद्वारे प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन ;

 

भुसावळ (प्रतिनिधी) -रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (Alarm Chain Pulling – ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अलीकडील काळात अलार्म चेन पुलिंगचा अनेकदा चुकीच्या व अनावश्यक कारणांसाठी वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रत्येक प्रकरणात रेल्वे कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येते.

चुकून अलार्म चेन ओढणे, प्रवासी वेळेत गाडीत चढू न शकल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी चेन ओढणे, मोबाईल फोन किंवा इतर वस्तू खाली पडणे तसेच इतर किरकोळ कारणांसाठी अलार्म चेनचा वापर करणे हे नियमबाह्य असून, अशा प्रकारांमुळे रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम होतो.

गाडीतील अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर झाल्यास त्याचा परिणाम केवळ त्या गाडीतील प्रवाशांवरच होत नाही, तर त्यानंतर धावणाऱ्या इतर गाड्यांच्याही वेळापत्रकावर होतो. काही प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या अशा कृतीमुळे शेकडो प्रवाशांना विलंब, गैरसोय व मनस्ताप सहन करावा लागतो.

भुसावळ विभाग अशा अवास्तव अलार्म चेन पुलिंग (ACP) घटनांवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे. आर्थिक वर्ष २०२६–२७ मधील एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत भुसावळ विभागात अलार्म चेन पुलिंगची एकूण ७२२ प्रकरणे नोंदविण्यात आली. यापैकी ६७४ व्यक्तींवर कारवाई करून त्यांना दोषी ठरविण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ₹२,३६,४१०/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १४१ नुसार विनाकारण अथवा अनधिकृतपणे अलार्म चेन ओढणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून दंड अथवा कारावासाची शिक्षा होऊ शकते.

भुसावळ विभाग सर्व प्रवाशांना आवाहन करीत आहे की, किरकोळ अथवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेनचा वापर करू नये. आपल्या सोयीसाठी केलेल्या अशा कृतीमुळे इतर अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते.

रेल्वेच्या सर्व प्रवाश्यांनी आपल्या गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वी योग्य वेळी स्थानकावर पोहोचावे तसेच मर्यादित सामान सोबत ठेवावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी स्टेशन मॅनेजर कार्यालयात उपलब्ध असलेल्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वा व्हीलचेअर यांचा वापर करून वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचता येईल आणि गाडीत सुरक्षित चढता येईल. यामुळे किरकोळ कारणांसाठी अलार्म चेन चा वापर करण्याची गरज भासत नाही.