भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे कथित अनधिकृत नळजोडणीप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार अर्ज आणि प्रत्यक्ष स्थळ पंचनाम्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या पाहणीत संबंधित ठिकाणी दोन नळजोडण्या आढळल्याचा उल्लेख असून, त्या नळजोडण्यांची नगरपरिषदेच्या अभिलेखात नोंद उपलब्ध नसल्याचे नोटिशीत म्हटले आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून नियमानुसार नळजोडणी नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नोटीस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही न केल्यास संबंधित नळजोडणी खंडित करून नगरपरिषदेच्या नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. या प्रकरणात माहिती अधिकाराद्वारे पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदाराने शहरातील सार्वजनिक सुविधा व नियमांच्या अंमलबजावणीबाबत सर्वांवर समान निकष लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडींकडे उत्सुकता वाढली आहे.


