हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात तब्बल ६५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

भुसावळ, दि. ३१ जुलै : हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या नोंदीनुसार धरणाचे ३० रेडियल गेट प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले असून, नदीपात्रात १,८६० घनमीटर प्रति सेकंद अर्थात ६५,६८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाची सद्य पाणीपातळी २११.९०० मीटर असून, पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण जलसाठा २७६.०० दशलक्ष घनमीटर (Mm³) असून, तो एकूण क्षमतेच्या ७१.१३ टक्के इतका आहे. तर उपयुक्त जलसाठा १४३.०० दशलक्ष घनमीटर असून, त्याचे प्रमाण ५६.०७ टक्के आहे.

दरम्यान, २९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता धरणाची पाणीपातळी २११.६३० मीटर होती. त्यावेळी एकूण जलसाठा २६३.२० दशलक्ष घनमीटर (६७.८४ टक्के) आणि उपयुक्त जलसाठा १३०.२० दशलक्ष घनमीटर (५१.०६ टक्के) इतका होता. त्यावेळी धरणाचे ४ रेडियल गेट प्रत्येकी ०.५० मीटरने उघडून ५,२२७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.

३०जुलै गुरुवारी रात्री ११ वाजेच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी २११.६५० मीटर इतकी झाली आहे. धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे.

 धरणातील एकूण जलसाठा २६४.०० दशलक्ष घनमीटर (Mm³) असून, तो एकूण क्षमतेच्या ६८.०४ टक्के आहे. तर उपयुक्त जलसाठा १३१.०० दशलक्ष घनमीटर असून, त्याचे प्रमाण ५१.३७ टक्के इतका होता.

धरणाचे ८ रेडियल गेट प्रत्येकी १.०० मीटरने उघडण्यात आले होते, त्यातून तापी नदीपात्रात ४८४ घनमीटर प्रति सेकंद (१७,०९२ क्युसेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता. 
   मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अवघ्या दोन दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन जलसाठा ७१.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, नदीपात्रातील विसर्गातही मोठी वाढ करण्यात आली असून, तो ५,२२७ क्युसेक्सवरून थेट ६५,६८६ क्युसेक्सपर्यंत पोहोचला आहे.

   धरणातून कालव्यात ५.६६ घनमीटर प्रति सेकंद अर्थात २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. 
हतनूर धरण परिसरात आज ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस १७२ मिलिमीटर इतका झाला आहे.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर मागील २४ तासांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये चिखलदरा येथे सर्वाधिक १४९.४ मिमी, तर टेक्सा येथे ८५.४ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. अन्य केंद्रांमध्ये बऱ्हाणपूर ९.४ मिमी, देढतलाई १७.३ मिमी, एरडी १३.८ मिमी, गोपालखेडा ५.८ मिमी, लखपुरी ३२.४ मिमी, लोहारा १६.४ मिमी आणि अकोला २५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

पाणलोट क्षेत्रातील सर्व केंद्रांवर झालेल्या पावसाची एकूण नोंद ३५५.७ मिलिमीटर, तर सरासरी पाऊस ३९.५ मिलिमीटर इतका आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक आणि विसर्ग याकडे प्रशासनाचे लक्ष असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.