भर पावसात भुसावळमध्ये उपवर्गीकरणाविरोधात ‘एल्गार’; नाहाटा कॉलेजपासून प्रांत कार्यालयावर विराट महामोर्चा-अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये; विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी ) : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात भुसावळ शहरात बुधवार, दि. २२ जुलै रोजी ‘एल्गार महामोर्चा’ काढण्यात आला. भर पावसातही हजारोच्या संख्येने आंदोलक या महामोर्चात सहभागी झाले. नाहाटा कॉलेजपासून सुरू झालेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, भुसावळ तालुका व शहराच्या वतीने आयोजित या महामोर्चात विविध सामाजिक, राजकीय तसेच आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत शासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भर पावसातही आंदोलकांचा उत्साह आणि आंदोलनाची तीव्रता कायम राहिली.

उपवर्गीकरणाला विरोध; शासनाकडे विविध मागण्या
महामोर्चानंतर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील भुसावळ यांना निवेदन देण्यात आले.  
 अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा विचार करता अनुसूचित जातींमध्ये परस्पर मागासलेपण सिद्ध करणारा आवश्यक अभ्यास किंवा आकडेवारी उपलब्ध नसल्याने उपवर्गीकरणाची आवश्यकता नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला.

याशिवाय खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करावे, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे प्रमाण वाढवावे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांचा निधी वाढवावा आणि तो इतर योजनांकडे वळवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचा विविध शासकीय विभागांतील अनुशेष विशेष भरती मोहिमेद्वारे तातडीने भरावा, सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार व संविधानिक आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवण्यासाठी सरसकट खासगीकरणाला प्रतिबंध घालावा, अशीही मागणी करण्यात आली.

हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री, मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.

या महामोर्चाचे नेतृत्व राजू सूर्यवंशी, गणेश सपकाळे, बाळा पवार, जगन सोनवणे, शाताराम जाधव, बाळा मोरे, सुधीर जंजाळे, उन्हास पगारे, बाळा सोनवणे, सुमंगल अहिरे, रवींद्र, संदीप सावळे, ॲड. धनराज मगर, बाळू सोनवणे, वाल्मिक देहाडे, मुन्ना सोनवणे आणि विजय सावळे यांनी केले. या महामोर्चात सर्व समाजबांधव उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*महिलांची उपस्थिती लक्षणीय*.... 

या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उपवर्गीकरणाच्या विरोधातील मोर्चामध्ये संगीता भामरे, राजश्री सोनवणे ,भारती म्हस्के , वंदना सोनवणे, निरंजना तायडे, लक्ष्मी मकासरे , जयश्री इंगळे, यांच्यासह मनोरमा निकम व पल्लवी गुरचळ, खडका येथील शोभाताई सुरवाडे व पंचफुला तायडे, वेल्हाळा येथील कांचनताई वेल्हाळा व कविता सुरवाडे, सुसरी येथील मुक्ता ताई व जमदाडे ताई , मनारखेडा येथील सविता जमदाडे, कपिल वस्ती येथील छायाताई व सोनवणे वहिनी, वराडसीम येथील मंगला सबकाळे, आंबेडकर नगर येथील मंगला सबकाळे, पंढरीनाथ नगर येथील झनके मॅडम व मंदाकिनी केदारे मॅडम, भीम ज्योत मंडळातील मालू ताई व उषा बनसोडे, दक्षशिला लाल मंदिर येथील रंजना शेळके व मोरे, कंडारी येथील मालू नरवाडे व सुलोचना ताई साबळे, भीमवाडी व ओडनस येथील राणी ताई खरात व प्रिया ताई गायकवाड, चांदमारी सात नंबर पोलिस चौकी परिसरातील सीमा आहिरे व पल्लवी आहिरे, प्रल्हाद नगर येथील तायडे आई व पांढरे काकू, पंचशील नगर येथील नरवाडे ताई व साळुंखे ताई, गौतम नगर येथील मोरे आई व बागडे ताई, पिंपळगाव येथील सोनवणे ताई व सुरवाडे ताई, फुलगाव येथील लोखंडे ताई व सोनवणे ताई, वरणगाव सिद्धेश्वर नगर येथील छाया कृष्णमूर्ती जोहरे, अनिता जोहरे व धनधरे आशा थोरात, तसेच  निलूताई इंगळे व संध्या तायडे आणि कंडारी व गौतम हाउसिंग सोसायटीमधील योगिता ताई सिंगारे, मालू ताई नरवाडे, सुलोचना साबळे, संगीता मोरे, मनीषाताई निकम, मनीषाताई सोनवणे व मीनाक्षीताई तायडे यांच्यासह असंख्य महिला भगिनी पाऊस, वादळ-वारा यांची पर्वा न करता समाजाच्या हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.