नाशिक हादरले; कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार; अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म: पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, चौकशी सुरू…!


नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कळवण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, निवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असतानाही संबंधित विद्यार्थिनीची गर्भावस्था वेळेत निदर्शनास कशी आली नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आरोग्य तपासणी व्यवस्था, विद्यार्थिनींवरील देखरेख आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीचीही सखोल चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.