यावल - रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजाळे येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. आमदार अमोलदादा जावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, फटाके व अनावश्यक खर्च टाळून वृक्ष लागवड करावी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन कार्यकर्ते व नागरिकांना केले होते. त्यांच्या या सूचनेचे पालन करत अंजाळे येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य नितीन सपकाळे यांनी केले. यावेळी त्यांनी कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या सामाजिक व कृषी क्षेत्रातील योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला वढोदा येथील सरपंच संदीप भैया सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त व परिश्रमाचे महत्त्व विशद केले. व अमोल यांच्या कार्याची माहिती दिली . विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास सरपंच यशवंत सपकाळे, वढोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सपकाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सपकाळे, नूतन विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मदन सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप निकम, भिका भाऊ सपकाळे, अशोक सपकाळे, मुख्याध्यापक आयुब तडवी सर, शिक्षकवर्ग, गावातील तरुण मंडळी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या विधायक उपक्रमाचे स्वागत करून कौतुक व्यक्त केले.



