शेगाव : शेगावातील एका प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने छापा टाकत विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या मालाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल, मसाले, पीठ तसेच इतर साहित्याची सखोल तपासणी केली. संशयास्पद वाटणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता व सुरक्षितता तपासण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणी अहवालात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणारे पदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व्यावसायिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याबरोबरच ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


