भुसावळ (प्रतिनिधी) – दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या न्यायहक्काच्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी ९ मेपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एस. पी. इंटरप्रायजेस या एजन्सीवर शासनाची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, कामगारांचे शोषण तसेच मजुरांच्या हक्कांवर गदा आणल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर श्रम करून घेतले जात असतानाही त्यांना अपुरे मानधन दिले जात असल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामगारांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. आवाज उठवणाऱ्या कामगारांवर दबाव टाकणे, दिशाभूल करणे आणि न्यायापासून दूर ठेवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने ६ मे २०२६ पासून दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सांगितले की, “कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. एस. पी. इंटरप्रायजेसच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.”
उपोषणादरम्यान कोणतीही अघटित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर राहील, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
या आंदोलनाला निळे निशाण सामाजिक संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष दिपक लोहार, निळे निशाण कामगार संघाचे अध्यक्ष आकाश सपकाळे, विभागीय अध्यक्ष रविंद्र कोळी यांच्यासह अनेक कामगार व स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दीपनगरातील हे आंदोलन सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


