भुसावळ-जळगावात ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे जल्लोषात स्वागत

भुसावळ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, 28 एप्रिल 2026 रोजी बनारस–पुणे (हडपसर) आणि अयोध्या–मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या रेल्वे सेवेचे भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, परीक्षीत बऱ्हाटे तसेच भाजपा पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक, रेल्वे अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या गाडीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

दरम्यान, जळगाव रेल्वे स्थानकावर खासदार स्मिता उदय वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य, पत्रकार तसेच स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या निमित्ताने स्थानिक शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

नवीन सुरू झालेली ही सेवा भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या गाड्या खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि नाशिक रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. बनारस–हडपसर (पुणे) ही गाडी दररोज धावणार असून अयोध्या–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे.

मध्यप्रदेशमार्गे धावणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि थेट होणार आहे. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि महाराष्ट्र–उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. थेट रेल्वे संपर्कामुळे वेळेची बचत होणार असून गाड्या बदलण्याची गरजही कमी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.