भुसावळ (प्रतिनिधी) – पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने भारत सरकारने १ जुलै २०२२ पासून सिंगल-यूज प्लास्टिकवर बंदी लागू केली असली, तरी भुसावळ शहरात अद्यापही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरातील भाजी, फळ, किराणा व मांस विक्री केंद्रांसह अनेक ठिकाणी १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग, ग्लास, कप, प्लेट यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे कठीण होत असून, त्यामुळे नाले व गटार तुंबण्याच्या समस्या वाढत आहेत. तसेच प्राणी व पक्ष्यांच्या जीवनालाही धोका निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भुसावळ पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत उपमुख्याधिकारी परवेज शेख यांना निवेदन सादर केले. शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, सुशील मोरे यांसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सदर निवेदनात भुसावळ पालिकेने १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही शहरात प्लास्टिक वापरावर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली असून, अन्यथा पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.


