भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक चिमणी दिनानिमित्त (२० मार्च) येथे प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जलपात्र वाटपाचा उपक्रम राबवून पर्यावरण जनजागृती करण्यात आली.

वाढते प्रदूषण, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. छोट्या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
प्रतिष्ठा महिला मंडळ गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये जलपात्र वाटप हा प्रमुख उपक्रम असून यावर्षीही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जलपात्रांचे वितरण करण्यात आले.
उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासते. त्यांच्या जीवितासाठी पाण्याची उपलब्धता करून देणे ही काळाची गरज असल्याने नागरिकांनी आपल्या घराजवळ, बाल्कनीत किंवा झाडांवर जलपात्र ठेवावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले.
या उपक्रमामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांनाही पाण्याची सोय होऊन पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश म्हणजे समाजात पक्ष्यांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि संवेदनशीलता वाढवणे हा असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे यांनी यावेळी दिली. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


