भुसावळ (प्रतिनिधी ) – 21 मार्च — जागतिक वन दिनानिमित्त पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी वनांचे महत्त्व अधोरेखित करत, पृथ्वीवरील वाढत्या पर्यावरणीय संकटांवर मात करण्यासाठी वनसंवर्धन अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, सध्या मोठ्या प्रमाणावर झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे मानवासमोर विविध गंभीर समस्या निर्माण होत आहेत. तापमानवाढ, दूषित हवा, अनियमित पाऊस, दुष्काळ आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी माती वाहून जाऊन जमीन नापीक होत असून जनजीवन विस्कळीत होत आहे.
जंगलांची संख्या घटल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच जंगलातील औषधी वनस्पती, मध, डिंक, बांबू यांसारख्या वनउत्पादनांमध्ये घट झाल्याने आदिवासींच्या उपजीविकेवरही परिणाम झाला आहे. पर्यटनात घट झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, जंगल ही निसर्गाची अनमोल देणगी असून ती पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांच्या मुळांमुळे पाणी जमिनीत झिरपत राहते आणि त्यातून झरे, नद्या निर्माण होतात. “वन असेल तर जल असेल” हे वास्तव असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, ऑक्सिजनयुक्त हवा, अन्न, औषधे आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा जंगलाशी निगडित आहेत. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जंगलांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
वनांचे महत्त्व लक्षात घेऊनच दरवर्षी 21 मार्च हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागरिकांनी अधिकाधिक वृक्षलागवड करून निसर्ग संवर्धनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
शेवटी त्यांनी “जंगल है तो मंगल है, नहीं तो सब अमंगल है” असा संदेश देत वनसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.


