भुसावळ (प्रतिनिधी) – चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व असून, नव्या कामांची सुरुवात व वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी घराघरांत गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो.

याच पार्श्वभूमीवर डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत निसर्गसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जंगलांची घट, वाढते तापमान, वायू व जलप्रदूषण यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची संख्या कमी झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. यामुळे विविध आजार, अवकाळी पाऊस, ढगफुटी आणि शेतीचे नुकसान अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
डॉ. पाटील यांनी आवाहन केले आहे की, या गुढीपाडव्यापासून प्रत्येकाने पर्यावरणपूरक संकल्प करावा. घरच्या घरी विविध फळझाडे व ऑक्सिजनयुक्त वृक्षांची बीजारोपण करून रोपे तयार करावीत आणि पावसाळ्यात त्यांचे संगोपन करून लागवड करावी. तसेच “एक पेड माँ के लिये” या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनात हातभार लावावा.
याशिवाय, वाढत्या प्लास्टिक वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले, नद्या आणि समुद्र प्रदूषित होत असून जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.
वायू प्रदूषण टाळण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करावा, तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उत्सवांमध्ये कर्कश आवाजाऐवजी सौम्य ध्वनीचा वापर करावा, असेही त्यांनी सुचवले.
गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश डॉ. पाटील यांनी समाजाला दिला आहे.


