गहुखेडा येथे सक्षम नारी फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – सक्षम नारी फाउंडेशन भुसावळ lतर्फे गहुखेडा येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ६ मार्च २०२६ रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरांमध्ये महिला दिन विविध उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर साजरा होत असला तरी ग्रामीण भागातील महिला अजूनही अशा कार्यक्रमांपासून काही प्रमाणात दूर राहतात. महिलादिनीही घरातील कामे व शेतातील जबाबदाऱ्या सांभाळण्यातच त्यांचा दिवस जातो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील महिलांसाठी खास भेट म्हणून सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या गहुखेडा या छोट्याशा गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संगिता तायडे (सरपंच, गहुखेडा), वत्सलाबाई चौधरी (उपसरपंच), मंदा पाटील (पोलिस पाटील) तसेच अॅड. स्मिता झाल्टे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

      प्रारंभी सौ. सुनिता जोशी यांनी स्वागतपर महिलाशक्तीचे गीत सादर केले. त्यानंतर मासिक पाळीबाबत समाजातील गैरसमज दूर करून त्याबाबत शास्त्रीय माहिती देणारी “आली माझी पाळी” ही नाटिका सुनिता जोशी, गायत्री विसपुते व सुनंदा डांगे यांनी सादर केली.

     तर डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. योग शिक्षिका संघमित्रा ढाकणे व वंदना कांबळे यांनी योगाचे महत्त्व सांगत विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली.

कार्यक्रमात ग्रामीण महिलांसाठी डोक्यावर पुस्तक ठेवून बॅलन्स करत धावण्याची शर्यत, संगीत खुर्ची यांसारखे खेळ आयोजित करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंद लुटला. तसेच माहितीवर्धक प्रश्नमंजुषाही घेण्यात आली.यावेळी विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात अनेक महिलांनी गाणी सादर करून आपली कला सर्वांसमोर मांडली. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत गावात अशा प्रकारचा महिलांसाठीचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्याबद्दल सक्षम नारी फाउंडेशनचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वंदना कांबळे यांनी केले. सुमारे १०० ते १५० महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुवर्णा गाडेकर, सुनिता जोशी, संघमित्रा ठाकणे, वंदना कांबळे, सुनंदा डांगे, गायत्री विसपुते व संगिता जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.