भुसावळ (प्रतिनिधी ) : अकलूद शिवारात १० ते १६ मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कथा संपल्यानंतर दररोज पुढील दोन तास भुसावळकडून यावल व फैजपूरकडे जाणाऱ्या मार्गावर जड व मध्यम वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी व वाहतूक शाखेने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. कथेनंतर मोठ्या प्रमाणावर भाविक पायी बाहेर पडत असल्याने यावल-फैजपूर मार्गावर पादचारींची संख्या वाढते. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी दोन तासांचा बफर कालावधी ठेवण्यात आला आहे.
चोरट्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष
कथास्थळाहून बाहेर पडणाऱ्या भाविकांची सुरक्षा हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले. गर्दीच्या वेळी वाहनांमुळे चेंगराचेंगरी किंवा अपघात होऊ नयेत म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच कथास्थळी चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार असून महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे गर्दीवर नजर
कथेला होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी बेरिकेडिंग करण्यात येणार आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सार्वजनिक मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणे व इतर संबंधित कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


