भुसावळ (प्रतिनिधी ) – कत्तलीपासून असंख्य गोमाता व नंदी देवाचे प्राण वाचविणारे, राज्यातील प्रख्यात गोरक्षक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद एकबोटे यांचा भुसावळ रेल्वे स्थानकावर गोसेवक बांधवांकडून जयघोषात सत्कार करण्यात आला.

एकबोटे यांचा प्रवास रामलला मंदिर, अयोध्या येथील दर्शनानंतर पुण्याकडे असा होता. परतीच्या प्रवासादरम्यान ते भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गोसेवक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर एकत्र आले. यावेळी गोमातेची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मिलिंद एकबोटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोमातेच्या सेवेसाठी वाहिले आहे. गाईला ‘राज्यमाता’चा सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आळंदी येथे अन्न-पाणी त्यागून आमरण उपोषण केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्य मातेचा सन्मान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याची भावना गोसेवकांनी व्यक्त केली.
एकबोटे हे अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या गोवंशाला लोकवर्गणीतून विकत घेऊन गोशाळेत सुरक्षित ठेवण्याचे कार्य करतात. कत्तलीपासून लाखो गोमाता व गोवंशाचे प्राण वाचविल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी केला.
“जन्मदिवशी वायफळ खर्च न करता गोशाळेत चारा व औषधे द्यावीत आणि गोमातेचा आशीर्वाद घ्यावा,” असा संदेशही ते सातत्याने देत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी गोसेवकांनी एकबोटे यांना आपल्या कार्यासाठी सदैव मार्गदर्शन व आशीर्वाद देण्याची विनंती केली. त्यांच्या प्रमाणेच गोमाता व मुक्या जीवांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य लाभावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी समीर कुलकर्णी, उमेश जोशी, वरुण पाटील, भूषण महाजन, चेतन जैन, कुणाल शिंदे, रोहित महाले, अनिकेत राजपूत, वैभव नेहेते, आदित्य धायडे यांच्यासह समस्त गोभक्त उपस्थित होते.


