मराठी रंगभूमी दिनानिमित्त उत्कर्षच्या कलावंतांनी केले प्रभावी सादरीकरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – ; उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेतर्फे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ताप्ती स्कूल येथे मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.

यात नटराज पूजनानंतर उत्कर्ष कलाविष्कार नाट्यसंस्थेच्या कलावंतांनी विविध नाटकातील प्रवेश सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.

सुशील पाटील आणि वैष्णवी बाविस्कर यांनी ‘या प्रश्नाला उत्तर नव्हते’ या नाटकातील एक प्रवेश सादर केला. यात समाज माध्यमातून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे येणारे ताण तणाव सादर केले. सोशल मीडियाने आज माणसांच्या जिवनावर कसे आक्रमण केले आहे. हे या नाट्यप्रवेशात त्यांनी मांडले.

तर आनंद सपकाळे यांनी ‘आणखी एक द्रोणाचार्य’ नाटकातील प्रसंग अतिशय प्रभावीपणे सादर करून आजच्या शिक्षण व्यवस्थेवर जळजळीत भाष्य केले.
यात प्राचीन काळातील एकलव्य द्रोणाचार्य यांच्या कथेचा संदर्भ घेऊन आजच्या शिक्षण विषयक परिस्थितीची भेदकता सपकाळे यांनी आपल्या अभिनयातून जिवंत केली.

उमेश गोरधे यांनी ‘ज्योतिबा सावित्री’ यांच्या शैक्षणिक कार्यावर आधारित स्वगत तर कुंदन तावडे यांनी नाटकाची नांदी सादर केली.

कार्यक्रमास संस्था अध्यक्ष अनिल कोष्टी, सचिव धर्मराज देवकर, श्रीकांत जोशी, किरण बाविस्कर, सुशील पाटील, राजू शेख, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, रमाकांत भालेराव, नितीन भालेराव, विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी बाविस्कर हिने केले तर आभार किरण बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रमास शहरातील अनेक जाणकार रसिक प्रेक्षक उपस्थित होते.