भुसावळ (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे राज्यात विजेची मागणी 19 हजार मेगावॅटपर्यंत घसरल्याने दीपनगरातील चारपैकी तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आले आहे. दीपनगरातील केवळ 660 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सहामधून राज्याला 350 मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. राज्याची वीज मागणी आगामी काळात वाढल्यानंतर उर्वरित संच कार्यान्वित केले जाणार आहेत.

दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन तसेच 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच वीज मागणी नसल्याने बंद आहे तर 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चारच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तीन संच बंद असल्याने केंद्रातील किमान 1210 मेगावॅट विजेची निर्मिती ठप्प .आहे. राज्याची वीज मागणी 29 हजार 700 मेगावॅटवरुन 19 हजार मेगावॅटपर्यंत घसरली आहे. विजेची मागणी नसल्याने सध्या केवळ 660 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमाक सहा मधून राज्याला केवळ 350 मेगावॅट वीजेची निर्मिती करुन पुरवठा केला जात आहे.
आगामी काळात रब्बी हंगामासाठी राज्यातील वीजेची मागणी वाढेल. यामुळे केवळ मागणी नसलेले अर्थात सीओडी केलेले संच सुरू केले जातील. यासोबतच 660 मेगावॅट प्रकल्पातूनही पुर्ण दाबाने वीजेची निर्मिती होऊ शकेल. दीपनगर प्रकल्पासोबतच राज्यातील इतर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संचही कमी वीज मागणीमुळे बंद करण्यात आले आहेत. या काळात महानिर्मिती व खुल्या बाजारातून काही प्रमाणात विजेची खरेदी केली जात आहे.
दीपनगर केंद्रातील केवळ एकमेव संच सुरू आहे. यामुळे काही दिवसांपासून प्लॉय अॅश कमी प्रमाणात निघत आहे. यामुळे दीपनगरच्या फ्लाय अॅशवर अवलंबून असलेल्या लघू उद्योजकांचे व्यवसायदेखील धोक्यात आले आहेत. लघू उद्योजकांना राखेचा नियमित पुरवठा करण्यात यावा, मोठ्या कंपन्यांना राख देण्याऐवजी स्थानिक छोट्या उद्योगांना वाचविण्यासाठी नियमांनुसार पुरवठा व्हावा, अशी मागणीही लघू उद्योजक उल्हास पगारे यांनी केली आहे.


