भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होताच भुसावळ पालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच चौका-चौकात भाऊ, दादांवर शुभेच्छांचा वर्षाव करणार्या राजकीय अधिकृत, अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टरवर कारवाई करण्यास सुरूवात झाल्याने भुसावळ शहर किमान निवडणूक होईपर्यंत बॅनरमुक्त होईल, अशी सुज्ञ नागरिकांना आशा आहे.
शहरातील सर्वाधिक डोकेदुखी वाढत्या अतिक्रमणासोबत बेशिस्त वाहतूक व चौका-चौकात झळकणार्या अनधिकृत बॅनरची आहे. ठिकठिकाणी भले मोठे बॅनर्स लावले जात असल्याने येणार्या-जाणार्या वाहनधारकांसाठी ही बाब अपघात होण्यास कारणीभूत ठरत होती. वारंवार ओरडूनही पालिका प्रशासनाने दखल घ्यावीशी वाटत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून पालिका प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत होता. शहरातील सर्वच चौकांमध्ये बॅनर, झेंडे, फलकांनी अक्षरशा धुमाकूळ घातला असताना पालिका प्रशासनाकडून अपवादात्मक कारवाई होत असल्याचा आरोप होत होता मात्र आचारसंहिता जाहीर होताच हे बॅनर काढण्याची तसदी पालिका प्रशासनाने घेतली आहे.
निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर केले असून 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 रोजी मतमोजणी होणार असल्याने पालिका प्रशासन आता झपाटून कामाला लागले आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता आदर्श आचारसंहिता जारी होताच पालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी विवेक माकोडे यांच्या नेतृत्वात जामनेर रोडपासून अधिकृत, अनधिकृत राजकीय बॅनर, झेंडे, ध्वज व पताका हटवण्यास सुरूवात झाली आहे.

शहरातील सर्वच नाके, सार्वजनिक ठिकाणे राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीने झाकोळून गेली आहेत. किमान आचारसंहितेच्या काळात तरी शहर एक महिना बॅनरमुक्त राहील हे निश्चित आहे.


