शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा हा शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा ; राज्य मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी मत मांडण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यात विविध क्षेत्रे, उपक्षेत्रे व मानकांचा समावेश आहे. हा आराखडा म्हणजे केवळ मूल्यांकनाची चौकट नसून ती शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा आहे. इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र उच्च माध्यमिक स्तरावर विषयांची गुंतागुंत, विद्यार्थी वर्गाची प्रगल्भता आणि शैक्षणिक गरजांनुसार या आराखड्यात नाविन्यपूर्ण बदल करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपल्या अनुभवातून व्यवहार्य, शैक्षणिक आणि गुणवत्तापूर्ण सूचना मांडाव्यात, असे आवाहन शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याचे राज्य मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यातील माहिती सुधारित आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे संपूर्ण राज्यभरात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यातील पहिली ऑनलाईन कार्यशाळा अमरावती गटातील उच्च माध्यमिक विभागात कार्यरत शिक्षकांची पार पडली. या कार्यशाळेत अमरावती, अकोला, अहिल्यानगर, भंडारा व बीड या पाच जिल्ह्यांतील उच्च माध्यमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे प्रास्ताविक अमरावती डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. पवन मानकर यांनी केले. त्यांनी या आराखड्याच्या माध्यमातून शाळा व शिक्षकांनी स्वतःचे आत्ममूल्यांकन करून शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर राज्य मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील (जळगाव) यांनी उच्च माध्यमिक विभागाच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा, बदल, हरकती आणि नवीन बाबींचा सविस्तर आढावा घेत शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शिक्षणातील गुणवत्ता वृद्धीसाठी डिजिटल साधनांचा वापर, शाळास्तरीय मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थीकेंद्री पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेत कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीपकुमार कुडाळकर म्हणाले की, मूल्यांकन आराखडा केवळ अहवाल देण्यासाठी नसून शाळेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आरसा आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे सातत्य राखण्यासाठी स्वमूल्यांकनाची प्रामाणिक अंमलबजावणी, शिक्षकांच्या सहभागातून सुधारणा उपक्रम राबविणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मूल्यांकनाच्या माध्यमातून शाळा स्वतःच्या कार्यक्षमतेचा नकाशा तयार करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत शहाणे, राज्य मार्गदर्शक समिती सदस्य सचिन कांबळे (मुंबई), भंडारा डायटचे प्राचार्य डॉ. राजेश रूद्रकार, अधिव्याख्याता विजय अजगर अकोला, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.जयपाल कांबळे बीड, अधिव्याख्याता कैलास सलगर अहिल्यानगर आणि उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च माध्यमिक विभागाच्या गरजांना अनुरूप अशा सुधारणा शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी सर्व सहभागी शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.