जळगाव : तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे ६८ गट व पंचायत समित्यांचे १३६ गण जाहीर झाल्यानंतर २१ जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या हाेत्या. त्यात शेवटच्या दिवसापर्यंत १२१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती चाळीसगाव व चाेपडा तालुक्यातून दाखल झाल्या आहेत. तर सात तालुक्यातून एकही हरकत नाही.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या रचनेविषयी शेवटच्या दिवशी २१ राेजी १०७ हरकती आल्या. एकूण तक्रारींच्या ८७ टक्के हरकती शेवटच्या दिवशी दाखल झाल्या. सुरूवातीचे दाेन दिवस १४ व १५ राेजी एकही हरकत नव्हती. १६ व १७ राेजी प्रत्येकी एक हरकत दाखल झाली. तर १८ राेजी १२ आणि शेवटच्या दिवशी २१ राेजी १०७ हरकती प्राप्त झाल्या. यात चाेपडा तालुक्यातून ४२, चाळीसगाव तालुक्यातून ४४, जामनेर ६, मुक्ताईनगर ११, रावेर १०, तर यावल, भुसावळ तालुक्यातून प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली आहे.



