मयत व्यक्तीने जावळे यांच्या समक्ष लिहून दिले खरेदीखत ; महसूल आणि नोंदणी महानिरीक्षकाकडून चौकशी सुरू ;


यावल – सन १९९५ मध्ये जालना येथे मृत्यू झालेल्या एका माणसाने यावल येथे यावल तालुक्यातील शेतजमीन ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अजित तुळशीराम भंडारी या व्यक्तीला यावल येथील दुय्यम निबंधक जावळे यांच्या समक्ष खरेदी खत लिहून दिले याबाबत पंकज श्रावण सोनार यांनी तक्रार केल्यानुसार या प्रकरणाची चौकशी आता यावल महसूल विभाग आणि पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक यांनी सुरू केली आहे त्यामुळे या बोगस खरेदी खत झालेल्या व्यवहारामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून यात जबाबदार अधिकारी,कर्मचारी अडचणीत येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
यावल येथील दुय्यम निबंधक सौ. जावळे यांच्या कडील दि.१६ जानेवारी २०२३ रोजी झालेला दस्त क्रमांक १०७/ २०२३ प्रत्यक्ष बघितला असता ( सही शिक्क्यानिशी काढलेल्या नकला ) त्यात लिहून घेणार अजित तुळशीराम मंडळी वय ४२ धंदा नोकरी व शेती रा. माध्यमिक विद्यालय जवळ तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे तसेच लिहून देणार गेलाराम भुरोमल वय ७२ धंदा नोकरी व शेती राहणार लकी अपार्टमेंट,विजयनगर,निवास मार्ग,कोकण मार्ग वसई पालघर असा असून ११ लाख १५ हजार रुपयाची खरेदी खत झालेले आहे.

परंतु गेलाराम भुरोमल वय ६५ याचा मृत्यू जालना येथे १ जानेवारी १९९५ मध्ये झाल्याची नोंद जालना महानगरपालिकेत दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी झाल्याचा सबळ पुरावा आढळून आला आहे.असे असताना यावल येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक महोदया सौ.जावळे यांच्या समक्ष आणि मृत्यू झालेला तथा लिहून देणारा गेलाराम भुरोमल आला कुठून..? तो जिवंत कसा झाला..? किंवा त्याच्या नावावर दुसरा व्यक्ती कोण..? त्या व्यक्तीला ओळखणारा साक्षीदार कोण..? आणि यात सर्व संबंधितांनी समन्वय साधून फार मोठा आर्थिक व्यवहार केला आहे काय..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका मयत व्यक्तीच्या नावाने खरेदी खत झाल्याची लेखी तक्रार १६ जून २०२५ रोजी पंकज श्रावण सोनार यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री,विभागीय महसूल आयुक्त,जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर, आणि तहसीलदार यावल यांच्याकडे तसेच पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तथा उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांच्याकडे दि.१८ जून २०२५ रोजी केल्याने या गंभीर अशा प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने या खरेदी खताची संबंधित सर्व यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून यात जबाबदार दोन-तीन अधिकारी कर्मचारी अडचणीत येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

कोट्यावधी रुपये किंमत असलेली शेतजमीन शासन जमा होणार…?
यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट नंबर १९३ या शेत जमिनीचे खरेदी खत जानेवारी २०२३ मध्ये झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने ही शेतजमीन ७५ लाख या शासकीय किमतीत २ एप्रिल २०२५ मध्ये खरेदी केले असले तरी प्रत्यक्षात या शेताची किंमत बाजार भाव प्रमाणे कोट्यावधी रुपयाच्या घरात आहे.
या शेताचा मूळ व्यवहार मृत व्यक्तीच्या नावाने झाल्याने दुय्यम निबंधक आणि महसूल विभाग हा झालेला व्यवहार बेकायदा, शासनाची फसवणूक दिशाभूल करणारा ठरवून शासन जमा करणार आहे का..? याकडे संपूर्ण यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.

बुधवार दि.१६ रोजी प्राथमिक चौकशी.
पंकज सोनार यांनी तक्रार केल्यामुळे या खरेदी खताशी संबंधित ६ जणांना यावल तालुक्यातील अंजाळे मंडळ अधिकारी यांनी नोटीस काढून बुधवार दि.१६ रोजी यावल येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या ग्राम महसूल कार्यालयात चौकशी कामी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. यापुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.