भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पद आरक्षण जाहीर !


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीतील सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याची महत्त्वपूर्ण सभा आज तहसील कार्यालयाच्या तापी सभागृहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी भूषवले.

या सभेमध्ये एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग , तसेच सर्वसाधारण या प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ नुसार पार पाडण्यात आली.आरक्षणनुसार सरपंच पदासाठी ग्रामपंचायतींची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली – अनुसूचित जातींसाठी ८ ग्रामपंचायती, अनुसूचित जमातींसाठी ७, मागास प्रवर्गासाठी ११ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. या प्रक्रियेमध्ये मागील निवडणुकीतील आरक्षणाचा इतिहास तसेच २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घेण्यात आली.विशेष म्हणजे काही ग्रामपंचायतींची आरक्षण निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. या पारदर्शक प्रक्रियेस अधिक विश्वासार्हतेचा स्पर्श देण्यासाठी गजल साटन (वय ६) या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्याचे उपस्थितांनी कौतुक केले.सभेला विविध ग्रामपंचायतींतील आजी-माजी सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक नागरिक तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आरक्षण प्रक्रियेतील पारदर्शकतेचे व निष्पक्षतेचे कौतुक केले

सभेच्या समारोप प्रसंगी तहसीलदार निता लबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पुढील निवडणूक प्रक्रियेस शुभेच्छा दिल्या. या सभेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.