भुसावळ (प्रतिनिधी ) –
मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता येण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ इत्यादी सर्व ठिकाणी प्रामाणिकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंकांचे काटेकोर पालन करावे असे सुस्पष्ट आदेश महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांनी प्रथम दिनांक सहा नोव्हेंबर 2009 आणि नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेले आहेत मात्र शासनाच्या अधिनस्त असलेले बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळ या सर्वांनी शासनाच्या सदर आदेशाला चक्क सोळा वर्षांपासून सातत्याने तिलांजली दिली आहे.
2025 26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीच्या मराठी भाषेच्या क्रमिक पुस्तकात शासनमान्य लेखन नियमांकडे व आदेशाकडे साफ दुर्लक्ष करून “बालभारतीने” मनमानी कारभाराचे सार्वत्रिक प्रदर्शन केले आहे.
नवीन नियमानुसार जोडाक्षर तोडून न लिहिता पारंपारिक पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे. मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने सर्वत्र जोडाक्षर चुकीच्या पद्धतीने लिहिली आहे. द्वार,पद्धत,समृद्ध,खड्डा, ऐवजी तोडून म्हणजे पदधत, समृदध अशी लिहिली आहेत श आणि ल ही अक्षरे नवीन लेखन नियमानुसार नाही. विशेष म्हणजे पान क्रमांक 13 आणि 45 वर स्वतः च चुकीच्या पद्धतीने लिहून विद्यार्थ्यांनाही तशीच( चुकीची असूनही) लिही, गिरव,असे सांगितले आहे. ” द” हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे “य” आल्यास दया असे न लिहिता द्या असे लिहावे हा नियम न पाळता सर्वत्र विद्यार्थी, गद्य ही अक्षरे चुकीच्या पद्धतीने लिहिले आहेत.
पान क्रमांक 67 वर” मुळाक्षरे असे म्हटले आहे.पण नवीन नियमात तो शब्द नाही त्या ऐवजी ” मराठी अक्षरमाला ” हा शब्द सुचविला आहे.त्यातही ” ऋ” ह्या दीर्घ स्वराचा वर्णमालेत समावेशच नाही तो ऱ्हस्व हवा .सूचनेत स्वर,व्यंजने ह्यांचा उल्लेख नियमबाह्य वाटतो .स्वर,व्यंजने, स्वरादी,विशेष व्यंजने नेमकी कोणती याचा उल्लेख करून त्यांची ओळख प्रथमपासूनच विद्यार्थ्यांना असावी.
आश्चर्याची गोष्ट अशी की, मराठी भाषा समिती अध्यक्ष व सचिवांसह एकूण 17 सदस्य आणि प्रस्तावना लिहिणाऱ्या माननीय संचालक साहेब यापैकी एकाच्याही लक्षात या लेखन विषयक चुका लक्षात का येऊ नये? विशेष म्हणजे काही सन्माननीय सदस्यांच्या नावात देखील अशुद्ध लेखन आढळते
अभिजीत भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेबद्दल पाठ्यपुस्तक मंडळच असे बेजबाबदारपणे वागत असेल तर भावी पिढी आपण कशी घडविणार आहोत? हा गंभीर प्रश्न आहे.



