आरोग्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम, निरोगी भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल.

पंढरपूर (सोलापूर) येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनात आज भागवत एकादशीच्या शुभमहुर्तावर युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत “फिट इंडिया – सायकल वारी” चे आयोजन करण्यात आले. सदर सायकल वारीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या ५००० सायकलपटूंनी पंढरपूरच्या वारकरी परंपरेत रंग भरत सहभाग नोंदवून अनोखा विक्रम केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली “फिट इंडिया” चळवळ आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. “फिट इंडिया – संडेज ऑन सायकल” ही युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय द्वारे डिसेंबर २०२४ मध्ये सुरू केलेली एक देशव्यापी फिटनेस चळवळ आहे. हा उपक्रम सायकलिंगला शाश्वत, समावेशक आणि पर्यावरणपूरक व्यायामाचा एक प्रकार म्हणून प्रोत्साहन देतो ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे असून, प्रत्येकाने हफ्त्यातून १ वेळा १ तासासाठी का होईना सायकल चालवायला हवी असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री श्री. जयकुमार गोरे, खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील, आमदार श्री. प्रशांत परिचारक, आमदार श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबईचे प्रादेशिक संचालक श्री.पांडुरंग चाटे, IRS आणि प्रसिद्ध एंडुरन्स सायकलस्वार व १९ वेळा आयर्नमॅन असलेले डॉ.अमित समर्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


