मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले : देशभरात तीन भाषांचे सूत्र लागू ; राज ठाकरेंचा आग्रह चुकीचा –

पुणे (प्रतिनिधी ) – आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असेही ते म्हणालेत.

ठाकरेंचा आक्षेप चुकीचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते आज बुधवारी पिंपरी चिंचवड येथील संतपीठाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जोरकसपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने 3 भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.

एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना तीन वर्ष चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी भाषा आपण यापूर्वी अनिवार्य केली होती. पण काल काढलेल्या जीआरद्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. आता आपण असे म्हटले आहे की, कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. तीन भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याशिवाय दोन भाषा व त्यातील एक भारतीय भाषा असावी असे हे सूत्र आहे.

बडगुजरांनी निती-नियमाने वागावे
भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षाच्या नियमानुसार वागण्याचाही सल्ला मुख्यमांयांनी दिला. सुधाकर बडगुजर यांच्यावर आमच्या नेत्यांनी टीका केली होती हे खरे आहे. नीतेश राणे यांनी यासंबंधी एक व्हिडिओ रीलिज केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशीनंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे सर्वकाही विधानसभा निवडणुकीपूर्वी घडले आहे. कुणी पक्षात येत असेल तर आपण निश्चितपणे त्यांचे स्वागत करतो.

सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कुणाचाही विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, काल पक्षप्रवेश ठरला, त्यावेळी आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या संदर्भात सकाळी कल्पना नव्हती की कालच प्रवेश आहे.