भुसावळ (प्रतिनिधी ) :ऑपरेशन सिन्दुर च्या यशानंतर भारतीय सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ भुसावळ शहरात हजारोंच्या संख्येने नागरिक मोटारसायकल घेऊन तिरंगा रॅलीत सहभागी झालेले होते भारत माता की जयचा जयघोष सर्वत्र घुमत होता

गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यामुळं भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भुसावळ शहरातील सर्व भारतीयांतर्फे रविवारी दुपारी चार वाजता बियाणी मिलीटरी स्कूल ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यादरम्यान तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांसह राजकीय लोकप्रतिनिधी या रॅलीत दुचाकीवरून सहभागी झाले.
या रॅलीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा प्रमुख सहभाग होता या शिवाय भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच तालुक्यातील पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
शहरात देशभक्तीपर वातावरण
तिरंगा रॅलीच्या अग्रभागी जीपवर भारत मातेची प्रतिमा ठेवण्यात आली तसेच रॅलीत देशभक्तीपर गाण्यांची धून वाजवण्यात आली शिवाय रॅलीत सहभागी सर्वांनीच हातात तिरंगा ध्वज हाती घेतल्याने शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा करण्यात आला.


