ऋतुमती महिला योग व प्राणायाम यांच्या माध्यमातून त्रासमुक्त होणे शक्य: डॉ. लीना चौधरी

भुसावळ – बोदवड 5 फेब्रुवारी 2025 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव आणि बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत ऋतुमती महिलांसाठी योग व प्राणायाम या विषयावर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील योगशास्त्र विभागातील प्रा. डॉ. लीना चौधरी यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रसंगी योगशास्त्र अभ्यासक मा. अमरीश चौधरी, जामनेर उपस्थित होते.

डॉ. लीना चौधरी यांनी आपल्या व्याख्यानातून मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित सर्व व्याधींवर उपाय म्हणून विविध आसने, प्राणायाम आणि नस्यांचे महत्व मुलींना पटवून दिले. प्राकृत मासिक पाळीचे स्वरूप, त्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळी विषयीचे समाजामध्ये रुजले गेलेले गैरसमज दूर करण्यात आले. त्या विशिष्ट दिवसांमध्ये सुद्धा कोणती आसने व प्राणायाम करता येतात त्यावर उद्भोदनच नव्हे तर योग व प्राणायाम अभ्यासक अमरीश चौधरी यांचे मार्फत उपस्थित असलेल्यांना कंधारासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, अनुलोम – विलोम आणि भ्रामरी या प्राणायामांचे महत्त्व आणि प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच श्वसनाचा अभ्यास देखील करून घेण्यात आला. योग व प्राणायाम यांच्या माध्यमातून महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान, आधी किंवा नंतर होणारा त्रास हा नष्ट होऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात 107 विद्यार्थिनींनी मार्गदर्शन घेतले.

तसेच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात जळगाव येथील योग- निसर्गोपचार आणि आहार तज्ञ, डॉ. सोनल महाजन यांचा विद्यार्थी विकास कक्षाच्या माध्यमातून ऋतुमती महिलांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी मानवी शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. हे पाचही तत्व मानवी शरीरात समतोल राखण्याचे कार्य करतात. शरीरातील पाणी तत्व कमी झाल्यास बाकीचे तत्व बिघडतात आणि मनुष्य आजारी पडतो. मानवी शरीरातील हार्मोन्स असमतोल असो किंवा कॅन्सर असो हे आपण शरीरातील पंचमहाभूतांचा समतोल राखून योग व निसर्गोपचारातून बरे करू शकतो असे सांगितले. वयात आलेल्या मुलींमध्ये पुरळ येणे, अंगावरून जाणे इत्यादी सारखे आजार हे सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आहेत. मुलींच्या पाळी संदर्भातील समस्या ह्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतात त्याचे कारण म्हणजे फास्ट फूडचे अति सेवन करणे, प्रसारमाध्यमांचा अति उपयोग अथवा वापर करणे इत्यादीमुळे कमी वयातच पाळी येणे या समस्या उद्भवताना दिसतात. घरच्या घरी जास्त पैसे खर्च न करता निसर्गोपचार पद्धतीने शरीरावर कुठलाही दुष्परिणाम न होऊ देता वरील व अन्य काही समस्या दूर करणे शक्य आहेत असे प्रतिपादन डॉ. सोनल महाजन, जळगाव यांनी केले. या कार्यक्रमात जवळपास 70 विद्यार्थिनींनी उपस्थिती दिली होती.

उपरोक्त दोन्हीही कार्यक्रमांचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. अजय पाटील यांनी केले, सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अजित पाटील, प्रा. शरद पाटील, प्रा. युवराज आठवले, डॉ. भीमराव शिरसाट, प्रा . तुषार सोनवणे, प्रा. अखिलेश यादव, प्रा. धीरेंद्र यादव,डॉ. भाग्यश्री चौधरी, प्रा . पूजा अग्रवाल, प्रा. राधिका अग्रवाल, प्रा. किनगे,श्री शेखरसिंग चव्हाण, श्री समीर पाटील, पल्लवी हरणे, पायल राजपूत, रेखा शेजोले , रोहिणी धनगर, गीता चौधरी, देवयानी पाटील, पूजा बोदडे, करीना निकम, जयश्री बोदडे इत्यादी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.