भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. वारंवार निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी उपमुख्याधिकारी शेख परवेज यांना गुलाबपुष्प देत आपला निषेध नोंदवला.

प्रभागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्ते खोदले गेले आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे खोकला, दमा आणि अॅलर्जी सारख्या आजारांचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली.
गेल्या १० ते १२ वर्षांपासून रस्ते, नाले आणि गटारांची दुरुस्ती तसेच साफसफाई न झाल्याने परिसरात घाण साचून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. याशिवाय, पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटनांचा धोका वाढल्याचेही नागरिकांनी सांगितले.
पावसाळा जवळ आला असताना नाल्यांची साफसफाई न झाल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नाल्यांवर जाळी बसविणे आणि संरक्षण भिंत उभारण्याची मागणी नागरिकांनी केली असून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, परिसरात नियमित कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी वाढत असून, कीटनाशक फवारणी व ब्लीचिंग पावडर टाकण्याचे काम वेळेवर होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत “कर भरूनही सुविधा मिळत नाहीत” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आंदोलनात फयाज अहमद दलमीर खान, राजू चौधरी, शेख मोहम्मद रफिक, मुश्ताक आबीद मोहम्मद, साजीद, संजय अहिरे, मुस्ताक अहमद शफी, मजीद खान, प्रशांत शेख, गुलजार शेख, अहमद खान यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.


