सूर्य आग ओकतोय : भुसावळचा पारा ४४.७ अंशांवर, पुढील तीन दिवस उष्णतेची लाट

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाने ४४.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २५ ते २७ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट कायम राहणार असून २६ एप्रिल हा सर्वाधिक तापदायक दिवस ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले असून उष्णतेपासून बचावासाठी टोपी, रुमाल, सनग्लासेस यांचा वापर वाढला आहे.

उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असून चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या-जुलाब अशा तक्रारी वाढल्या आहेत. दुपारी ११ ते ४ दरम्यान बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि प्रकृती बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आसिफ शेख यांनी केले आहे.

तीन दिवसांचा अंदाज

  • २५ एप्रिल: कमाल ४३°C, किमान २७-२९°C
  • २६ एप्रिल: कमाल ४५°C पर्यंत जाण्याची शक्यता
  • २७ एप्रिल: कमाल ४२-४३°C, किमान २७-२९°C

या काळात आकाश स्वच्छ राहणार असून हवेतील आर्द्रता केवळ १५ ते २५ टक्क्यांपर्यंत राहील. वारा मुख्यतः पश्चिमेकडून मंद गतीने वाहणार आहे. पावसाची शक्यता अत्यल्प असल्याने पाणी व्यवस्थापनाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

हवामान तज्ञांच्या मते, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे ढगनिर्मिती होत नाही आणि सूर्याची उष्णता जमिनीवर अडकते. तसेच अरबी समुद्रात कोणतेही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय नसल्याने ओलसर वारे येत नाहीत, परिणामी उष्णता अधिक तीव्र जाणवत आहे.

विशेष काळजी घेण्याचे आवाहन

दुपारी १ ते ४ या वेळेत बाहेरील श्रमाची कामे टाळावीत. घरात पंखा किंवा एसी नसल्यास थंडावा राखण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करावा. लहान मुले, गर्भवती महिला आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी सांगितले.

दरम्यान, शहरात रात्रीही उकाडा जाणवत असून किमान तापमान २७ ते ३० अंशांच्या दरम्यान राहणार आहे. सलग वाढणाऱ्या तापमानामुळे हा एप्रिल गेल्या दशकातील सर्वाधिक उष्ण एप्रिल ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.