भरधाव टँकरच्या धडकेत दोघे ठार ;

एरंडोल – भरधाव टँकरवर दुचाकीवर धडकून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. अपघातानंतर टँकरसह चालक पसार झाला. हा अपघात रविवार, 22 रोजी रात्री घडला. अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली.
राजेंद्र भिला भोई (46, रा.एरंडोल) व दीपक रामकृष्ण भोई (44, शिरसोली) ता.जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. दोघे मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 बी.पी.2073) ने जात असतांना जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या टॅकरने जोरदार धडक दिल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर दुसर्‍याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू ओढवला.
अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर
रास्तारोको आंदोलन केले. रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला. महामार्गावरच अवजड वाहन आडवे लाऊन वाहतूक रोखून धरली.रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. या ठिकाणी यापूर्वीदेखील अनेकवेळा अपघात झाले असून अपघाती जागा म्हणून या जागेची ओळख निर्माण झाली आहे. अमळनेर नाका येथून नवीन वसाहतींमध्ये येणार्‍या व जाणार्‍या नागरिकांची मोठी वर्दळ असते. एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन एका युवक ठार झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका परिसरात अंडरपास करण्यात यावा अथवा उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक निरीक्षक गोविंद पवार, उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त अपघातस्थळी ठेवण्यात आला.