भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी महिला ग्रामसभा विविध विषयांवर गाजली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. निधीचा खर्चाचा तपशील देखील या वेळी मागण्यात आला. सत्ताधारी सदस्य सभेत उपस्थित असावे अशी अपेक्षा असताना मात्र एक-दोन सदस्यच सभेला उपस्थित होते. याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
गावातील ग्रामसभा बहुतांश वेळा कागदावरच घेतली जाते व मर्जीतले ठराव मंजूर करण्यात येतात, असा नेहमीच ग्रामस्थांचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर होत असतो. बुधवारी ग्रामसभा विविध विषयांवर गाजली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावामध्ये जलवाहिनी टाकण्यात आली, मात्र यामुळे रस्त्यांची संपूर्णत: विल्हेवाट लागली आहे ते त्वरित दुरुस्त करावे तसेच होणारे रस्ते हे खोदून तयार करावे, सद्यस्थितीला गावातील रस्ते उंच व घर खाली अशी स्थिती असल्याची समस्या देखील यावेळी ग्रामस्थांनी मांडली.
कर्मचायांनी कर्तव्यात कसूर करू नये, वेळेवर हजर राहावे कामाचा तपशील द्यावा, अशी कानउघाडणी ग्रामविकास अधिकारी तायडे यांनी ग्रामसभेत केली. पुढील ग्रामसभेत गाव हद्दीतील असलेले गुरुकुल, ट्रामा सेंटर, फार्मसी कॉलेज, नवोदय विद्यालय, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रतिनिधीला बोलवावे व विविध योजनेचा काय लाभ होऊ शकेल याबद्दल चर्चा करावी यावरही चर्चा झाली.
प्राप्त झालेल्या पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून पैशांची मर्जीपणे विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप या वेळी विरोधी सदस्यांनी केले. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चौकशीची मागणी देखील केली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरपंचांनी डिजिटल सह्या कराव्या
अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. गावामध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलावर्ग मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मात्र त्यांना बचत गटासाठी हॉल नसल्याने, महिलांना हॉल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे गावातील जि.प. मराठी व उर्दू शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण
राहिले आहे. तसेच शाळेच्या मैदानाकडून एमआयडीसीला जाणाऱ्या रस्त्याकडील रखडलेले प्रवेशद्वाराचे कामही त्वरित करावे, अशी मागणीदेखील करण्यात आली. प्रवेशद्वार नसल्यामुळे चोरीचे प्रकार सातत्याने घडत असून शाळांच्या वर्गखोलीचे देखील वेळोवेळी नुकसान करण्यात येत आहे. मुलींकरिता मुतारीची व्यवस्था करावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.
अंगणवाडीसमोर समोर अतिक्रमण करण्यात येत असून मुलांना शाळेत येणे त्रासदायक झाल्याची तक्रार अंगणवाडी सेविकेकडून तक्रार करण्यात आली. अंगणवाडीच्या समोरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
गटाराची समस्या सोडवावी! प्रभाग क्रमांक सहा मध्ये गटारीची समस्या असून ती त्वरित सोडवावी णअशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी केली. याशिवाय अपंगांसाठी शासनाच्या भरपूर योजना असून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे यांनी केली.



